
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले. महाराष्ट्र शासनाने १४ ऑगस्ट २०२५ रोजी गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’म्हणून घोषीत केल्यामुळे या उत्सवाचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. परंतू हा उत्सव साजरा करताना नागरिकांची सुरक्षितता, कायद्याचे पालन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे. आपल्या आनंदामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी भक्तिभाव कायम ठेवून शिस्तबद्ध रीतीने आणि सामाजिक भान जपून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे काळाची गरज आहे.. !
राज्य महोत्सवातून पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संदेश- राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्यानंतर यंदाच्या वर्षी हा उत्सव अधिक व्यापक, नियोजनबद्ध आणि लोकसहभागातून साजरा होण्यासाठी सर्व शासकीय विभाग प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभव राज्याच्या सीमेपलीकडे पोहोचवण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘लोककलेतील श्री गणेश’ आणि ‘महा गणेशोत्सव – महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ अंतर्गत देशातील विविध शहरांमध्ये विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. चेन्नई, सिल्वासा, कोलकाता आणि हैदराबाद मध्ये हे कार्यक्रम होणार आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यातील विविध कला, संस्कृती आणि लोकपरंपरांना चालना देणारे कार्यक्रम, शाडूच्या मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन, ‘इको-फ्रेंडली गणेश मूर्ती रंगरंगोटी महोत्सव, हातकागद कला संवर्धन, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम, हस्तकला प्रदर्शन, सामाजिक जनजागृती आणि विशेष उपक्रम राबवण्यात येत आहेत.
भव्य महा गणेशमूर्ती कार्यशाळा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. हा संदेश व्यापक स्वरुपात पोहोचविण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे नवी मुंबईत ‘पर्यावरणपूरक महा गणेशमूर्ती कार्यशाळा’ घेण्यात आली. 10 हजारांहून अधिक शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी एकाच वेळी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या.
मातीच्या मूर्तींना प्राधान्य- पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी राज्यभर व्यापक जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाडू माती किंवा नैसर्गिक मातीच्या गणेशमूर्तींना नागरिकांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे. मूर्ती विसर्जनासोबत निर्माल्य संकलन, कचरा व्यवस्थापन आणि मंडप परिसराची स्वच्छतेकडेही गांभीर्याने पाहावे लागेल. जलस्रोतांचे संवर्धन – नदी, तलाव आणि अन्य जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मूर्ती संकलन व ‘मूर्तीदान’उपक्रम राज्यभर राबवण्यात येतो. या उपक्रमाला नागरिकांनी आणि गणेशोत्सव मंडळांनी सहकार्य करायला हवे. घरगुती मूर्तींचे विसर्जन घरच्या घरी किंवा कृत्रिम तलाव, कुंड अशा पर्यायी व्यवस्थेत करणे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. भक्तिभाव कायम ठेवून जलस्रोतांचे संरक्षण करण्याचा संदेश या माध्यमातून देता येईल.
डीजेमुक्त उत्सव साजरा करुन संस्कृतीचा गजर करुया- यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत डीजे आणि लेझरमुक्त उत्सवासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांकडून सकारात्मक भूमिका घेतली जात आहे. मर्यादेपेक्षा अधिक तीव्रतेच्या आवाजामुळे, लहान बालके, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक आणि ह्रदयविकाराच्या रुग्णांना धोका पोहचल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या आनंदामुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी ध्वनी मर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे. पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम, झांज पथक, पोवाडे, शिवकालीन कला, लोकनृत्य आणि विविध लोककलांच्या सादरीकरणावर भर दिल्यास लोककला जपल्या जातील. तसेच स्थानिक लोककलाकारांना रोजगाराची संधी मिळवून देण्याचे सत्कार्य घडेल. यामुळे ‘तीव्र आवाज टाळूया.. संस्कृतीचा गजर करुया’ ही गणेशोत्सवाला ओळख देता येईल.
लेझरमुक्त गणेशोत्सव – अतितीव्र लेझरच्या प्रकाशामुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा पोहचली आहे, तर काहींना डोळे गमवावे लागले आहेत. त्यामुळे आकर्षक रोषणाई करताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करणे अत्यावश्यक आहे. लेझरचा वापर टाळून सुरक्षित प्रकाशयोजनेला प्राधान्य द्यावे. यंदा डीजेसोबत लेझर लाईटच्या वापराबाबतही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उत्सवातील आकर्षण वाढवताना नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे प्रत्येक मंडळाची जबाबदारी आहे.
गणेशोत्सवातून सामाजिक संदेशाची प्रभावी मांडणी – गणेशोत्सव मंडळे ही समाजप्रबोधनाची प्रभावी माध्यमे आहेत. शासकीय योजनांची माहिती, रक्तदान, आरोग्य तपासणी, स्वच्छता, वृक्षारोपण, महिला व बालसुरक्षा, व्यसनमुक्ती आणि वाहतूक शिस्त यांसारख्या विषयांवर आधारित संदेश जास्तीत जास्त मंडळांनी देखाव्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचवावा. ‘माझा गणपती – माझी सामाजिक जबाबदारी’ हा विचार प्रत्येक मंडळाकडून पोहोचवता येईल.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची लोकचळवळ – राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नियोजन आणि जनजागृतीला चालना देण्यात येत आहे. ‘एक गाव, एक गणपती’सारख्या विधायक संकल्पनांसोबत घरगुती गणेशमूर्तींसाठी माती, धातू, संगमरवर किंवा अन्य पर्यायी मूर्तींचा विचार, कृत्रिम विसर्जन स्थळांचा वापर, मूर्ती व निर्माल्य संकलन आणि योग्य व्यवस्थापन याबाबत गावपातळीवर प्रबोधन करण्यात येत आहे. आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामपंचायत यांचा लोकसहभाग या उपक्रमाला व्यापक स्वरुप देत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची प्रभावी तयारी – कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत साधारणपणे सन 2015 पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन यंदाही उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कुटुंबे आणि गणेशोत्सव मंडळांनी मूर्तीदान, निर्माल्य संकलन आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करून गटविकास अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संनियंत्रण व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सन २०२५ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात २ लाख ९१ हजार ३१९ घरगुती तर २ हजार ४१० सार्वजनिक गणेशमुर्ती अशा एकूण २ लाख ९३ हजार ७२९ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. यासोबतच ३८५ घंटागाड्या आणि १ हजार ३५२ ट्रॉलीद्वारे निर्माल्य संकलन करण्यात आले आहे. यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूरकर सज्ज आहेत.
युवकांनी उत्सवासोबत भविष्याचाही विचार करावा – उत्सवादरम्यान डीजे नियमांचे उल्लघंन, वादविवाद, मारामारी, रस्यावरील बेशिस्त वर्तन, वाहतूक नियमांचे उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन आणि हुल्लडबाजी, महिलांची छेडछेड, सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्ट अशा गैरप्रकारांमुळे गुन्हे दाखल होऊ शकतात. अशा गुन्हयांमध्ये अडकल्यास तरुणांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो. शैक्षणिक अभ्यासक्रमांचे प्रवेश, परदेशी शिक्षण, शासकीय नोकरी किंवा इतर संधींसाठी आवश्यक असलेल्या चारित्र्य पडताळणीच्या प्रक्रियेत या बाबींचा विचार होऊ शकतो. त्यामुळे युवकांनी उत्साहाच्या भरात कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. ‘एक दिवसाचा उत्साह, आयुष्यभराची अडचण होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
प्रशासनाला सहकार्य – वाहतूक व्यवस्था, मिरवणुकीचे मार्ग, वेळेचे नियोजन, ध्वनीमर्यादा, अग्निसुरक्षा आणि गर्दीच्या व्यवस्थापनाबाबत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे प्रत्येक मंडळाची जबाबदारी आहे. महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वयंसेवकांची व्यवस्था, मदत कक्ष आणि आपत्कालीन संपर्क यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांमधील समन्वयातून उत्सव अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी होईल.
उत्सव काळात स्वच्छतेला प्राधान्य – गणेश मंडपाचा परिसर, मिरवणुकीचे मार्ग आणि विसर्जनस्थळांवर स्वच्छता राखणे ही गणेश मंडळांची आणि यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. उत्सवादरम्यानचे निर्माल्य, प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि अन्य कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून स्वच्छतेचा जागर करणे आवश्यक आहे. बाप्पांच्या आगमनावेळी आणि विसर्जनावेळीही परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प प्रत्येकाने जोपासायला हवा.
महाराष्ट्रासाठी आदर्श गणेशोत्सव घडवूया- लोकसहभागातून साजरा होणाऱ्या महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. या उत्सवाला सामाजिक परिवर्तनाचा विचार लाभला आहे. या परंपरेला पर्यावरण संवर्धन तसेच नागरिकांची सुरक्षितता, सामाजिक बांधिलकीची जोड देण्याची गरज आहे. शासनाच्या वतीने लोककलांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, मातीच्या गणेश मूर्ती कार्यशाळा, उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धा, सजावट स्पर्धा व अन्य उपक्रमांच्या माध्यमांतून पर्यावरण पूरक गणेशोत्सवावर भर देण्यात येत आहे. तसेच प्रदूषणमुक्त परिसर, स्वच्छता, सामाजिक कार्य आणि विधायक उपक्रमांना महत्त्व देण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच पारंपरिक कलांचे जतन, स्थानिक कलांना प्रोत्साहन आणि ग्रामीण भागातील कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही तर तो लोकसंस्कृती, सामाजिक एकोपा, पर्यावरण संवर्धन आणि जबाबदारीची शिकवण देणारे व्यासपीठ आहे. आनंद साजरा करताना आपला उत्सव पर्यावरणासाठीही मंगलमय ठरावा, यासाठी प्रत्येकानं छोटंसं का होईना पण जबाबदारीनं, आणि मनापासून एकेक पाऊल सकारात्मक दिशेनं उचलणं काळाची गरज आहे.
श्री गौरी -गणेशाच्या भक्तीचा उत्साह कायम ठेवून, सामाजिक भान राखून आणि भावी पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करुया आणि या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करुया…!
वृषाली पाटील-
सहायक संचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

WhatsApp