नागपूर येथे जिल्हा न्यायालयासाठी आधुनिक व सुसज्ज इमारत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    - Advertisement -

    नागपूर दि,११: येथील न्यायविषयक कामकाजाची वाढती व्याप्ती पाहता येथील जिल्हा न्यायालयासाठी लवकरच प्रशस्त जागेत आधुनिक व सुसज्ज इमारतीची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. न्यायव्यवस्थेतील घटकांनी वंचित-आकांक्षित समुहाशी बांधिलकी जोपासण्याचे आवाहनही त्यांनी केले.

    नागपूर येथील जिल्हा वकील संघटनेचा पदग्रहण सोहळा आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर, विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, नागपूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. आझमी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश जायसवाल, सचिव अनिल गुल्हाने, संघटनेचे माजी अध्यक्ष रोशन बागडे, माजी सचिव मनिष रणदिवे आदी यावेळी उपस्थित होते.

    जिल्हा वकील संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन श्री. फडणवीस म्हणाले, न्यायव्यवस्थेत आमुलाग्र बदल झाला असून तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या बदलत्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांचा न्यायदानाच्या प्रक्रियेवरील विश्वास दृढ करण्याचा व वेगाने न्याय मिळावा ही सामान्यांची अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे. नागपूरच्या बार असोसिएशनचीच परंपरा अतिशय गौरवशाली आहे, असे ते म्हणाले.


    भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा गौरव करून श्री. फडणवीस म्हणाले, त्यांनी गोरगरीब व गरजूंना केलेली मदत आपण पाहिली आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी कायम इतरांना मदत व सहकार्य केले असून त्यांचा हा आदर्श न्यायदानाच्या प्रक्रियेतील सर्व सक्रीय घटकांनी डोळ्यासमोर ठेवावा आणि समाजातील वंचित – आकांक्षित घटकांसाठी काम करण्यासाठी प्रयत्न करावा.

    कायदा, न्यायव्यवस्था आणि वकील संघाच्या भूमिकेवर विशेष भर देत माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले, ज्यूडीशियल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून मागील काही वर्षात याबाबत भरीव काम झाले आहे. विधी विद्यापीठ, कोल्हापूर खंडपीठाच्या निर्मितीसह विविध महत्त्वाची कामे मार्गे लागली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी निधीची कमतरता भासू दिलेली नाही. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अनेक कामे मार्गे लावली आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे विधी क्षेत्राचा विकास होत असून वकिलांनी सामाजिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवावा असे त्यांनी सांगितले.

    नागपूरच्या बार असोसिएशनची दीडशे वर्षांची परंपरा अतिशय गौरवशाली असून सामाजिक जाणिव आणि बांधिलकी जपणाऱ्या वकिलांच्या जडणघडणीसाठी बार असोसिएशनने पुढाकार घ्यावा, असे आवाहन न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी यावेळी केले. वकिली हा व्यवसाय नसून ते सामाजिक कार्य आहे. चार भिंतींच्या बाहेर जाऊन समाजाचा शेवटच्या व्यक्तीपर्यंत जोडले जाण्यासाठी या व्यवस्थेतील सर्व घटकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

    नुतन कार्यकारणीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश जायसवाल, नागपूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. रोशन बागडे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी नागपूर बार असोसिएशनचे सदस्यत्व बहाल करण्यात आले.
    जिल्हा वकील संघटनेच्या नव्या कार्यकारणीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश एस. जायसवाल आणि सचिव ॲड. अनिल गुल्हाने यांच्यासह उपाध्यक्ष ॲड. विकास करहाडे व ॲड. वैशाली बगाडे, सहसचिव ॲड. पंकज राजवाडे व ॲड. रुबी सिंग, कोषाध्यक्ष ॲड. प्रीती पिंपळकर आणि ग्रंथालय प्रमुख ॲड. सौरभ राऊत यांनी तसेच सर्व सदस्य ॲड. रोहित रामटेके, ॲड. सुशांत पाटील, ॲड. इन्दरदीप सिंग कलसी, ॲड. अमेय फुंडे, ॲड. मंगेश लाढे, ॲड. नवज्योत सोनी तसेच महिला राखीव प्रतिनिधी म्हणून ॲड. पूजा शर्मा, ॲड. स्नेहा पेटकर व ॲड. मेघना बोबडे यांनी पदग्रहण केले.

    जिल्हा वकील संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी विधी तज्ज्ञ, वकील, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

    00000

    - Advertisement -