भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतन व संवर्धनासाठी एशियाटिक सोसायटीने पुढाकार घ्यावा – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १३ : भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने पुढाकार घ्यावा. संस्थेकडील ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करून हा ज्ञानसंग्रह देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

    टाउन हॉल येथे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या नवनिर्वाचित समितीच्या परिचय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार अमित साटम, प्रवीण दरेकर, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, सचिव विवेक गणपुले आदी उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक रमेश दंडवते यांनी एशियाटिक सोसायटीच्या बळकटीकरणासाठी ५० लाख रुपयांची मदत केली. त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, राष्ट्राची स्मृती, इतिहास, संस्कार, भाषा, अभिलेख आणि परंपरांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. इतिहास आणि सांस्कृतिक परंपरांचे संरक्षण करणाऱ्या राष्ट्राची अस्मिता कधीही नष्ट होत नाही. भारतीय ज्ञानपरंपरा अनेक आव्हानांनंतरही टिकून राहिली आहे. ज्ञान कोणत्याही चौकटीत बंदिस्त न राहता मुक्त असले पाहिजे. या ज्ञानाचा उपयोग देशासह संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी व्हावा.

    भारतीय इतिहास, पुरातत्त्व, भाषा, तत्त्वज्ञान, साहित्य आणि विज्ञानाचे पुनर्मूल्यांकन भारतीय दृष्टिकोनातून होणे आवश्यक आहे. सोसायटीने महाराष्ट्रातील विद्यार्थी व संशोधकांना संग्रहाच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यावे, ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करावे आणि देशातील ग्रंथालये व संशोधन संस्थांना सामायिक व्यासपीठावर जोडावे. तसेच ‘ज्ञान भारत राष्ट्रीय पांडुलिपी मिशन’मध्ये सक्रिय सहभाग घेऊन गावागावांत आणि विद्वानांच्या घरांमध्ये जतन केलेल्या दुर्मीळ पांडुलिपींचा शोध, संकलन, संवर्धन व संशोधनासाठी विशेष अभियान राबवावे, असे आवाहनही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

    – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एशियाटिक सोसायटीच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. इतिहास हा केवळ भूतकाळ समजून घेण्याचे साधन नसून वर्तमानाला दिशा देणारा आणि भविष्याचा वेग निश्चित करणारा महत्त्वपूर्ण दुवा आहे, असे त्यांनी सांगितले. मानवतेचा प्रवास, विचारांची जडणघडण, अभ्यासपद्धती आणि विविध शास्त्रांची उत्क्रांती यांचे दस्तऐवजीकरण होणे अत्यावश्यक आहे.

    परकीय आक्रमणांमध्ये नालंदा विद्यापीठाची मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेली ग्रंथसंपदा आणि त्यासंदर्भातील घटनांतून ज्ञानसंपदेच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित होते. मात्र, अनेक विद्वानांनी उपलब्ध ग्रंथांचे संरक्षण करून ही समृद्ध ज्ञानपरंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली. या परंपरेचे जतन आणि संवर्धन करणे ही आजची मोठी जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

    नव्या कार्यकारिणीच्या प्रयत्नांमुळे संस्थेला नवसंजीवनी मिळाली असून एशियाटिक सोसायटी नव्या उमेदीने कार्यरत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सोसायटीच्या ग्रंथालय विभागाच्या मुख्य कार्यालयासाठी नवीन जागा तयार झाली आहे. या ठिकाणी मुख्य कार्यालय लवकरच सुरू करण्यासाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल. सोसायटीच्या मुख्य कार्यास अधिक बळ मिळावे, तसेच येथे येणाऱ्या अभ्यासकांना आवश्यक ग्रंथ, संदर्भसाहित्य आणि ज्ञानसंपदा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल. मुख्यमंत्री कार्यालय, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून आवश्यक मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी एशियाटिक सोसायटीच्या नूतन कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत संस्थेच्या भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

    – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एशियाटिक सोसायटीचा २२२ वर्षांचा गौरवशाली वारसा आहे. प्राचीन ग्रंथ, पांडुलिपी व नाणी यांचे जतन भावी पिढ्यांसाठी आवश्यक असून या वारशाच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारकडून संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयोजित या कार्यक्रमाबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदनही केले.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथे ‘गणेश ज्ञानारती’ प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रदर्शनाची पाहणी करून ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेव्यांची माहिती जाणून घेतली.

    प्रदर्शनात मौर्य, सातवाहन, गुप्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुमारे १,३०० दुर्मीळ सुवर्ण, रजत, कांस्य व तांब्याची ऐतिहासिक नाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. भगवान गौतम बुद्धांच्या भिक्षापात्राचा अंश, बुद्ध प्रतिमा व बोधिसत्त्वाचे अवशेषही मांडण्यात आले आहेत. मुघलकालीन हिंदुस्तानाचा १७८८ मधील नकाशा आणि नर्मदा नदीचा १८७० मधील नकाशाही प्रदर्शनाचे आकर्षण आहे.

    भारतीय राजे व जमीनदारांचा शाही दरबार अल्बमसह अनेक दुर्मीळ ऐतिहासिक ग्रंथही येथे प्रदर्शित करण्यात आले होते. कोल्हापूर व कान्हेरी येथील पुरातत्त्वीय उत्खननातील वस्तू तसेच बुद्ध प्रतिमा यांच्यासह भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वीय वारशाचे समृद्ध दर्शन घडविणारे हे प्रदर्शन होते.

    एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. आभार सचिव विवेक गणपुले यांनी मानले.

    00000

    - Advertisement -