लॅबग्रोन डायमंड उद्योगात भारताचे जागतिक नेतृत्व; नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह – महासंवाद

    - Advertisement -

    इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’मध्ये उद्योगातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव

    मुंबई, दि. १३ : प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिन्यांचे उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्री व्यवस्थेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी भारतात उभारावी. या उदयोन्मुख क्षेत्रात भारतीय उद्योगाने जागतिक नेतृत्व प्रस्थापित करावे, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

    भारतातील रत्न व आभूषण उद्योगातील उत्कृष्टता, नेतृत्व आणि उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणारा ५२ वा ‘इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’ सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पणन मंत्री जयकुमार रावल, खासदार गोविंद ढोलकिया, आमदार अमित साटम आणि कौन्सिलचे अध्यक्ष किरीट भन्साळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासह रत्न व आभूषण क्षेत्रातील उद्योजक, निर्यातदार, उत्पादक, बँकर्स, महिला उद्योजक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की, भारताकडे पायाभूत सुविधा, ऊर्जा, भांडवल आणि उद्यमशील व्यापारी वर्गाचे सामर्थ्य आहे. लॅबग्रोन डायमंडची जागतिक बाजारपेठ आगामी काळात मोठ्या प्रमाणात विस्तारण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संधी ओळखून भारतीय उद्योगाने केवळ कामाची गतीच नव्हे, तर व्यवसायाची व्याप्तीही वाढवावी. भारतीय कंपन्यांनी जागतिक ब्रँड निर्माण करून प्रमुख शहरांमध्ये स्वतःची विक्री केंद्रे उभारावीत. यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल.

    रत्न व आभूषण उद्योगासाठी नवी मुंबईत मोठी जागा आणि आवश्यक एफएसआय उपलब्ध करून देण्याची भूमिका मांडली आहे. हा उद्योग महाराष्ट्राबाहेर जाऊ नये, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचेही केंद्रीय मंत्री शाह यांनी सांगितले.

    भारताला रत्न व आभूषण व्यापाराची प्राचीन परंपरा

    भारताची रत्ने आणि आभूषणे ही हजारो वर्षांपासून जगभरातील ओळख आहे. सुमारे सहा हजार वर्षांपूर्वीपासून भारतातून रत्ने व आभूषणांचा व्यापार होत असल्याचे नमूद करून केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की, मध्ययुगीन काळात राजाश्रयामुळे जडजवाहीर आणि आभूषण कलेला नवी उंची मिळाली. कुंदन, मीनाकारी यांसारख्या कलांचा विकास झाला. जयपूरची ओळख आजही रंगीत रत्नांची जागतिक राजधानी म्हणून आहे.

    जगभरात पैलू पाडल्या जाणाऱ्या प्रत्येक दहा हिऱ्यांपैकी नऊ हिऱ्यांवर सुरतमध्ये प्रक्रिया होते. सुरतच्या हिरे उद्योगाने लाखो नागरिकांना रोजगार आणि आत्मनिर्भरता दिली असून, देशाच्या अर्थव्यवस्थेत व निर्यातीत मोठे योगदान दिले आहे. मुंबईनेही रत्न व आभूषण व्यापाराला निर्यातीची महत्त्वाची धुरा बनविले आहे. भारत डायमंड बोर्स हे भारतीय रत्न व आभूषण उद्योगाच्या जागतिक सामर्थ्याचे प्रतीक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

    निर्यात २ लाख ४४ हजार कोटी रुपयांवर

    वर्ष २०२५ मध्ये भारताची रत्न व आभूषण निर्यात २ लाख ४४ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. देशाच्या एकूण व्यापारी माल निर्यातीत या क्षेत्राचा वाटा ६.३ टक्के आहे. या उद्योगातून सुमारे ७५ लाख नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. अमेरिका, मध्यपूर्व, हाँगकाँग आणि युरोपसाठी भारत हा आभूषणांचा महत्त्वाचा पुरवठादार ठरला आहे.

    भारत जगातील ९० टक्क्यांहून अधिक कटिंग आणि पॉलिशिंग केलेल्या हिऱ्यांवर प्रक्रिया करतो. हे भारतीय उद्योजकांच्या साहसाचे आणि कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. युरोपियन युनियन, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, ओमान आणि युनायटेड किंगडमसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारांचा उपयोग करून उद्योगाने नव्या बाजारपेठा आणि व्यावसायिक संधी शोधाव्यात, असेही शाह यांनी सांगितले.

    विशेष अधिसूचित क्षेत्रात रफ डायमंडचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांना प्राप्तिकरातील दीर्घकालीन सवलत देण्याच्या निर्णयामुळे भारताला जगातील रफ डायमंड ट्रेडिंग हब बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण सुरुवात झाल्याचे ते म्हणाले.

    पायाभूत सुविधा, उत्पादनाला प्रोत्साहन देणाऱ्या योजना आणि निर्यातवाढीसाठी उपलब्ध सुविधांमुळे भारत वेगाने प्रगती करीत आहे. वर्ष २०४७ पर्यंत भारताला प्रत्येक क्षेत्रात जगातील अग्रणी राष्ट्र बनविण्याच्या संकल्पात रत्न व आभूषण उद्योगाने महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहनही केंद्रीय मंत्री शाह यांनी केले.

    नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्कमुळे एक लाख कोटींची गुंतवणूक, ५० हजार रोजगार अपेक्षित

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

     

    देशाच्या निर्यातीत तसेच आर्थिक विकासात रत्न व आभूषण उद्योगाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. या उद्योगाला पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुलभ दळणवळणाची जोड देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्कमधून सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० हजार रोजगार निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताच्या रत्न व आभूषण निर्यातीत मुंबई आणि महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे. भारत डायमंड बोर्सने निर्माण केलेल्या सक्षम परिसंस्थेमुळे या उद्योगाच्या वाढीला मोठी चालना मिळाली आहे. या ठिकाणी दररोज सुमारे ३० ते ३५ हजार व्यापारी, कारागीर आणि कर्मचारी एका कुटुंबाप्रमाणे कार्यरत असतात. त्यांच्या परिश्रमामुळे या क्षेत्राचा व्यापार २१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे.

    महाराष्ट्राचे स्वतंत्र रत्न व आभूषण धोरण

    राज्य शासनाने २०२५ मध्ये रत्न व आभूषण क्षेत्रासाठी नवीन धोरण तयार केले आहे. पारंपरिक व्यवसायाबरोबरच प्रयोगशाळेत विकसित करण्यात येणाऱ्या हिऱ्यांच्या, अर्थात ‘लॅबग्रोन डायमंड’ उद्योगासाठीही या धोरणात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. कर व परकीय चलन मिळवून देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणाऱ्या या उद्योगाला आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

    नवी मुंबईतील नियोजित जेम्स अँड ज्वेलरी पार्कसाठी राज्य शासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. या प्रकल्पाचे काम दसऱ्यापासून सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक आधुनिक रत्न व आभूषण परिसंस्था या ठिकाणी उभी राहणार असून, त्याचा राज्यासह देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होईल, असेही त्यांनी नमूद केले.

    भारत डायमंड बोर्सला ‘अखंड जोडणी’

    भारत डायमंड बोर्स परिसरात आगामी काळात बांधकाम, उद्योग आणि रोजगार वाढणार असल्याने वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात येत आहे. मेट्रो स्थानकातून भारत डायमंड बोर्समध्ये थेट प्रवेश मिळावा, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानकांवरून पॉड टॅक्सी सेवा सुरू करून कर्मचारी आणि कारागिरांचा प्रवास अधिक सुलभ केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

    बुलेट ट्रेन स्थानकाला कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंक, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल-२, कुर्ला परिसर आणि उत्तर कोस्टल रोडशी जोडण्यासाठी बोगद्यांद्वारे मार्गिका उभारण्याचेही नियोजन आहे. रेल्वे, मेट्रो, रस्ते आणि विमानतळ अशा सर्व वाहतूक सुविधांशी भारत डायमंड बोर्सची अखंड जोडणी करण्यात येणार आहे.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उभारल्या जाणाऱ्या नवभारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून उद्योगांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या रत्न व आभूषण उद्योगाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

    रत्न व आभूषण उद्योगाचे देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    रत्न व आभूषण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा सुमारे ५० टक्के असून, या क्षेत्राने देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या उद्योगाच्या माध्यमातून ५० लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले असून, सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात झाली असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत २०४७ च्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल सुरू केली आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून, सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची असलेली भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या उद्दिष्टपूर्तीत रत्न व आभूषण उद्योगाचे योगदान महत्त्वाचे राहील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

    इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स २०२६ पुरस्कार

    ‘जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल’च्या वतीने आयोजित ५२ व्या ‘इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’मध्ये विविध २७ श्रेणींचा समावेश करण्यात आला होता. ही कौन्सिल भारताच्या रत्न व आभूषण उद्योगाची सर्वोच्च संस्था असून, तिची स्थापना १९६६ मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाद्वारे करण्यात आली होती. १०,७०० हून अधिक सदस्य असलेली ही संस्था १९९८ पासून स्वायत्त आहे.

    आज देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये सर्वाधिक उलाढाल, सर्वाधिक रोजगारनिर्मिती, सर्वाधिक कर भरणारी कंपनी, कट अँड पॉलिश्ड डायमंड्स, मौल्यवान धातूंचे साधे व जडवलेले दागिने, चांदीचे दागिने, रंगीत रत्न, कॉस्च्युम/फॅशन ज्वेलरी, सिंथेटिक स्टोन्स आणि लॅबग्रोन डायमंड्स यांसारख्या श्रेणींचा समावेश होता.

    राष्ट्रीय स्तरावरील या पुरस्कारांच्या ५२ व्या सोहळ्यात निर्यातदार, उत्पादक, बँकर्स, महिला उद्योजक आणि उद्योगाची व्यवस्था सक्षमपणे सांभाळणाऱ्या सहकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. सर्वाधिक सामाजिकदृष्ट्या जबाबदार कंपनी (CSR), सर्वोत्तम नाविन्यपूर्ण विपणन व ब्रँडिंग मोहीम, परदेशातील रत्न व आभूषण विक्री, महिला उद्योजक, उद्योगाला वित्तपुरवठा करणारी सर्वोत्तम बँक, विशेष सन्मान, जीवनगौरव आणि कर्मचारी पुरस्कार अशा विविध श्रेणींमध्येही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    ०००००

    - Advertisement -