
मुंबई, दि. १५ : राज्यातील नद्यांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘महाराष्ट्र नदी संवर्धन अभियान’ राबविण्यात येईल. अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिक येथे आयोजित संमेलनातून लवकरच करण्यात येणार आहे. या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असून आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक येथे विशेष राज्यस्तरीय कार्यशाळा तसेच कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे.
मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नदी पुनरुज्जीवनबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस डॉ. राजेंद्र सिंह, सचिव एकनाथ डवले, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सचिव (लाभक्षेत्र विकास) प्रकाश मिसाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि जल बिरादरीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यांमधील १०८ नद्यांचा अभ्यास करण्यात आला. नद्यांविषयी जनजागृती करण्यासह त्या अविरल, निर्मळ आणि प्रवाही करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचाही अभ्यास करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिक, विद्यार्थी, पारंपरिक ज्ञान असलेले अभ्यासक, शास्त्रज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या सहभागातून लोकअभ्यास व कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत. या आराखड्यांमध्ये सुचविलेल्या उपाययोजनांच्या आधारे जलसंपदा विभाग आणि राज्य शासनाचे अन्य संबंधित विभाग समन्वयाने नदी संवर्धनाचे काम करणार आहेत.
जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी यावेळी महाराष्ट्रातील नद्यांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन हा महत्त्वाचा विषय आहे, असे सांगत या पार्श्वभूमीवर विविध पातळीवर शासनाच्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केले. महाराष्ट्रात नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी या प्रयत्नांचा भाग म्हणून नाशिक येथे होणारा कार्यक्रम महत्त्वाचा ठरेल असे ते म्हणाले.
बैठकीस जल बिरादरीचे नरेंद्र चुघ, डॉ. सुमंत पांडे, अभिनेते चिन्मय उदगीरकर, महेंद्र महाजन, राजेश पंडित, मनोज साठे आदि प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाचा अभ्यास करून आंध्र प्रदेशातही अशा प्रकारचा कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने जल बिरादरीचे राष्ट्रीय समन्वयक सत्यनारायण बोलशेट्टी यांनी बैठकीत सहभाग घेतला.
०००००
किरण वाघ/विसंअ

WhatsApp