नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता – महासंवाद

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता – महासंवाद
- Advertisement -

मुंबई, दि. १७: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांनी त्यांच्या सहाय्यित इन्क्यूबेशन सेंटरसाठी दोन दिवसीय धोरणात्मक कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेत राज्यभरातील इन्क्यूबेशन सेंटर प्रमुख, शैक्षणिक संस्था तसेच परिसंस्थेतील विविध घटक सहभागी झाले.

या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. यामुळे भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर यांना अधिकृतपणे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या सहाय्यित इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली. या धोरणात्मक समावेशामुळे विदर्भातील नवोपक्रम, उद्योजकता आणि नवउद्योगांच्या वाढीस मोठी चालना मिळणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यात मजबूत व सर्वसमावेशक नवउद्योग परिसंस्था उभारण्याबाबत शासनाची कटिबद्धता अधोरेखित केली. अशा संस्थात्मक सहकार्यांमुळे नवउद्योगांना योग्य मार्गदर्शन, साहाय्य व संधी उपलब्ध होऊन प्रादेशिक विकासास हातभार लागेल, असे त्यांनी नमूद केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी प्रारंभिक टप्प्यातील नवोपक्रमकर्त्यांना साहाय्य देण्यासाठी संस्थात्मक क्षमता वाढ महत्त्वाची असल्याचे सांगितले. जिल्हा व स्थानिक पातळीवर नवोपक्रम विकसित करण्यासाठी सक्षम इन्क्यूबेशन प्रणाली आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, राज्यात २९ सहाय्यित इन्क्यूबेशन सेंटरचे मजबूत जाळे उभे करण्यात आले असून ते नवउद्योगांना कल्पनांपासून विस्तारक्षम उपक्रमांपर्यंत पोहोचण्यास मदत करत आहेत. तसेच इन्क्यूबेशन सेंटरनी परस्पर ज्ञान, कौशल्य व संधींची देवाणघेवाण करत सहकार्यपूर्ण परिसंस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यशाळेत इन्क्यूबेशन पद्धती अधिक सक्षम करण्याबरोबरच दीर्घकालीन शाश्वततेवरही भर देण्यात आला. अटल नाविन्यता मिशनचे माजी संचालक आणि नीति आयोगाचे अतिरिक्त सचिव रमणन रमणाथन, आयएसबीएचे अध्यक्ष प्रसाद मेमन यांच्या सत्रांमध्ये इन्क्यूबेशन सेंटरची आर्थिक, कार्यात्मक व धोरणात्मक शाश्वतता सुनिश्चित करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या इन्क्यूबेशन केंद्रामध्ये नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेचा समावेश झाल्यामुळे विदर्भातील नवउद्योजकांना मार्गदर्शन, उद्योगसाखळीशी जोडणी आणि नवोपक्रम साहाय्य अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे इच्छुक उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण होऊन महाराष्ट्राची देशातील अग्रगण्य नवउद्योग केंद्र म्हणून ओळख अधिक बळकट होणार आहे.

०००

- Advertisement -