पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून पीक परिस्थितीची पाहणी – महासंवाद

    - Advertisement -

    जालना,दि. २८ : पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागाची पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी पाहणी केली. पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी आज बदनापुर तालूक्यातील कडेगाव, गेवराई बाजार आणि गोकुळवाडी तसेच जालना तालुक्यातील गणेशनगर शिवारातील शेतांमध्ये जाऊन पिकांची स्थिती जाणून घेतली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे जालना आणि बदनापुर तालूका दौऱ्यात शेतकरी बांधवांना आधार देत म्हणाल्या की, नुकसानग्रस्त पिकांची अवस्था पाहिल्यानंतर परिस्थिती गंभीर आहे.

    परंतु शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. राज्य शासनाकडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, कृषी कर्जाच्या वसुलीला स्थगिती आणि कृषीपंपांच्या चालू वीजबिलात सवलत देण्याचा समावेश आहे.

    पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा यासाठी प्रशासकीय स्तरावर नियोजन केले जात आहे. ज्या भागात चाऱ्याची तीव्र टंचाई आहे, तिथे तातडीने चारा डेपो सुरू करणे आणि गाळपेरा जमिनींचा योग्य वापर करण्याबाबत धोरण आखले जात असल्याचे पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले. शेतकरी आणि शेतमजुरांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बँक खात्यात तांत्रिक त्रुटी नसलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना मदतनिधीचे वाटप वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी आमदार अर्जून खोतकर, आमदार नारायण कुचे, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा अधिक्षक गहिनीनाथ कापसे, बदनापुर उपविभागीय अधिकारी लता बागुल यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

    ००००

    - Advertisement -