
मुंबई, दि. ८ : भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड, जिवंत आणि प्रखर अभिनयाने तब्बल चार दशकांपेक्षा जास्त काळ रसिकांच्या मनावर एकछत्री अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके झाले आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक महान नटच नव्हे, तर समाजाच्या दुःखाशी थेट जोडलेला एक अत्यंत संवेदनशील माणूस आपण गमावला आहे, अशा अत्यंत भावूक शब्दांत विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण सांस्कृतिक आणि सामाजिक विश्वात शोकाकुल वातावरण पसरले आहे. त्यांच्या भावपूर्ण आठवणींना उजाळा देताना सचिन अहिर म्हणाले, “नाना पाटेकर हे केवळ पडद्यावरचे कलाकार नव्हते, तर ते अथांग संवेदनशीलतेचे मूर्तिमंत रूप होते. ‘नटसम्राट’ असो वा ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’ असो वा ‘अपहरण’, त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारी ठरली. मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीला डायलॉगच्या माध्यमातून एक वेगळा आयाम दिलेला आहे. त्यांचा भारदस्त आवाज, संवादफेकीची ती आगळीवेगळी शैली आणि डोळ्यांतील ती थेट भिडणारी भाषा मराठी अन् हिंदी रसिकांच्या मनात कायमची कोरली गेली आहे.”
अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत नावलौकिकत्व मिळाल्यावरही एक सर्वसाधारण माणसाच्या जीवनशैलीत जगणारा लोक कलावंत म्हणून लक्षात राहील. हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांना एका मुलाखतीत असे विचारले होते की, तुम्ही एवढे सगळे ऐश्वर्य सोडून गाव खेड्यात कष्ट करतात. स्वतःचे काम स्वतःच करतात. हे सगळे कसे जमते. त्यावर नाना पाटेकर असे म्हणाले, माणसाने आपला मूळ स्वभाव व मूळ परिस्थिती कधीच विसरू नये. आपल्याला जीवन जगण्यापुरते जेवढे लागते तेवढेच आपल्याजवळ ठेवावे. ही सर्व समानतेची व मानवतेची भावना आज हरपली आहे. नाना केवळ अभिनयापुरते मर्यादित न राहता नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी मजूर त्यांच्या समस्या शासन दरबारी ठामपणे मांडल्या. आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कायम मदतीचा हात दिला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अश्रूंची जाणीव ठेवून त्यांनी उभं केलेलं सामाजिक कार्य हे त्यांच्यातील संवेदनशील माणसाची साक्ष देते, अशी आठवण उपसभापती श्री. अहिर यांनी करून दिली.
“नानांनी नेहमीच सामान्यांच्या दुःखाला आपलं मानलं. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून, महाराष्ट्र एका कणखर तरीही भावुक व्यक्तिमत्त्वाला पोरखा झाला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या करोडो चाहत्यांना व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,” अशी प्रार्थना उपसभापती सचिन अहिर यांनी केली.
००००

WhatsApp