जिल्ह्यात ३९ टँकरव्दारे ४१ गावे, २८६ वाड्यातील ८० हजाराहून अधिक बाधित लोकसंख्येला पाणीपुरवठा – महासंवाद

    - Advertisement -

    सांगली, दि. १० (जि. मा. का.) : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बाधित गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे तसेच स्थानिक पातळीवर खाजगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे.  जिल्हा परिषदेच्या ९ ऑक्टोबर अखेरच्या अहवालानुसार ३२ खाजगी व ७ शासकीय अशा एकूण ३९ टँकरव्दारे ४१ गावे व २८६ वाड्यातील ८० हजार ७९९ बाधित लोकसंख्येला व ८  हजार ३०१ पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी २५ खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित केल्या आहेत.

    जत तालुक्यातील टंचाईग्रस्त ३३ गावे व २३१ वाड्यांमधील सुमारे ६७,७९२ लोकसंख्येला ३२ टँकरद्वारे (२६ खाजगी व ६ शासकीय) पाणी पुरवले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात १४ खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या असून २ डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आले आहेत.

    कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त १ गाव व ८ वाड्यांमधील १८३४ लोकसंख्येसाठी १ शासकीय टँकर सुरू आहे. नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्यामुळे गावात पाणीटंचाई भासू नये यासाठी २ खाजगी विहिरी/बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

    तासगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त १ गाव व ६ वाड्यांमधील ८५५ लोकसंख्येला १ खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तालुक्यात ३ खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

    आटपाडी तालुक्यातील टंचाईग्रस्त ६ गावे व ४१ वाड्यांमधील १०३१८ नागरिकांना आणि ८३०१ पशुधनाला ५ खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. या तालुक्यात ३ विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत.

    खानापूर तालुक्यात २ गावे टंचाईग्रस्त असून ३ खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत.

     

    000000

     

    - Advertisement -