पावसाच्या ओढीने बीड जिल्हा होरपळला; केंद्रीय पथकासमोर दुष्काळाचे भीषण वास्तव – महासंवाद

    - Advertisement -

    • चारा केवळ १५ दिवसांचा; पशुधन जगवण्यासाठी ‘चारा डेपो’ची शेतकऱ्यांची मागणी
    • बिंदुसरा तलावात केवळ ५ टक्के साठा; शहरावर पाणीबाणी
    • फळबागा सुकल्या; हेक्टरी २ लाख रुपये तातडीच्या मदतीची मागणी

    बीड, दि. १० (जिमाका) : पावसाच्या प्रदीर्घ ओढीमुळे बीड जिल्ह्यातील दुष्काळाने गंभीर रूप धारण केले आहे. खरीप पिके करपली असून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने दोन दिवस जिल्ह्याचा दौरा केला. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल, राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग आणि जिल्हाधिकारी डॉ. विवेक जॉन्सन यांच्या पथकासमोर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि मागण्या मांडल्या.

    तलाव कोरडे, शहरावर पाणीबाणी

    बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा तलावात सध्या केवळ ५ टक्के उपयुक्त साठा उरला आहे. गेल्या वर्षी याच काळात हे धरण १०० टक्के भरलेले होते. शहराला दररोज लागणाऱ्या ३८ एमएलडी पाण्यासाठी आता माजलगाव धरणावर अवलंबून राहावे लागणार आहे. उपलब्ध साठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ग्रामीण भागात मोरगाव, वैद्यकिन्ही आणि दासखेड येथील पाझर तलाव कोरडे पडले असून विहिरींनी तळ गाठल्याने जलसंकट अधिक गडद झाले आहे.

    ५४ हजारांच्या खर्चातून हाती केवळ १० हजार

    सलग ६५ दिवस पावसाचा थेंबही न पडल्याने सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत करपले. दासखेड येथील शेतकरी सुधाकर ठोंबरे यांनी तीन एकरांत ५४ हजार रुपये खर्चून पेरणी केली. मात्र त्यातून केवळ ९ ते १० हजार रुपयांचे (दीड-दोन क्विंटल) उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. महिला शेतकरी रेखा कोकाटे यांच्या दीड-दोन एकरांत केवळ ४० किलो सोयाबीन निघेल, अशी स्थिती आहे. लाखो रुपये खर्चून उभ्या केलेल्या डाळिंब आणि मोसंबीच्या बागाही पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत.

    चारा संपल्याने पशुधनाचे संकट

    खरिपाच्या नुकसानीसोबतच पशुधन कसे जगवायचे, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. पाटोदा तालुक्यातील बेडूकवाडी येथील वैभव आणि अंकुश शिंदे या बंधूंची व्यथा जिल्ह्यातील पशुपालकांचे प्रतिनिधित्व करणारी आहे. दररोज सुमारे १३० लिटर दूध संकलन करणाऱ्या या कुटुंबाकडे घरचा चारा केवळ १५ दिवस पुरेल इतकाच उरला आहे. बाहेरून चारा खरेदी करायचा तर प्रति टन ११ हजार रुपये मोजावे लागतात. सोयाबीनची वाढ खुंटल्याने नाइलाजाने हार्वेस्टरने काढणी करावी लागली, त्यामुळे जनावरांसाठी भुसकटही उपलब्ध नाही.

    शेतकऱ्यांच्या मागण्या

    या संकटातून सावरण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. फळबागा जगवण्यासाठी हेक्टरी दोन लाख रुपयांची तातडीची मदत, शेततळ्यांसाठी ५० हजार रुपये अनुदान आणि जनावरांचे प्राण वाचवण्यासाठी तात्काळ ‘चारा डेपो’ सुरू करणे, या मागण्या त्यांनी लावून धरल्या. शासन या हतबल शेतकऱ्यांना कधी आणि किती दिलासा देणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

    वैजाळ्यात पथकाचा शेतकऱ्यांशी संवाद

    पाटोदा तालुक्यातील वैजाळा येथे केंद्रीय पथकाने कांदा, झेंडू आणि मका उत्पादकांशी संवाद साधला. पाण्याअभावी पिकांची झालेली अवस्था, वाढत्या तापमानाचा परिणाम, उत्पादनातील घट आणि सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता याबाबत पथकाने माहिती घेतली.

    कांदा उत्पादक बंकट शेवराव येडे यांनी पाणीटंचाईमुळे कांद्याची लागवड १० एकरांवरून यंदा केवळ एक एकरावर आणावी लागल्याचे सांगितले. शेततळ्यातही पाणी नसल्याने पिकाच्या भवितव्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. झेंडू उत्पादक पांडुरंग बाबासाहेब मस्के आणि मका उत्पादक काकासाहेब नामदेव येडे यांनीही वाढत्या तापमानामुळे झेंडूच्या फुलांचा आकार लहान होत असल्याचे आणि पावसाअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याचे सांगितले. पाण्याची प्रतीक्षा, घटते उत्पादन आणि वाढता खर्च अशा संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुभवांतून दुष्काळाची तीव्रता अधोरेखित झाली.

    - Advertisement -