फळबागा जगविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार – मंत्री भरत गोगावले – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २ – राज्यात फळबागा असलेल्या एकूण 6 लाख 85 हजार हेक्टर क्षेत्रापैकी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सुमारे 2.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे. या भागातील तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फळबागा जगविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असून या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

    विधानसभा सदस्य सुरेश धस यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील 14 जिल्ह्यांमध्ये बाधित होणाऱ्या फळबागा जगविण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देण्याची विनंती मंत्री गोगावले यांच्याकडे केली. या अनुषंगाने मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री गोगावले यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.

    राज्यात असलेल्या तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील शेतकरी बाधित झाला आहे. विविध पिकांसोबतच या भागातील फळबागा लागवडीवरील क्षेत्र सुमारे 2.5 लाख हेक्टर एवढे असून पाणी पुरवठ्याअभावी उभी असलेली फळबाग नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील फळबागांना पाणीपुरवठा करणे अथवा त्यासाठी शेतकऱ्यांना व्हीबी जीरामजी योजनेच्या माध्यमातून मदत करणे, अशा उपायोजना करणे गरजेचे आहे. याबाबत मंत्री गोगावले यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारकडून व्हीबी जीरामजी योजनेअंतर्गत 375 कामांकरिता राज्यासाठी 4420 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्या निधीबरोबरच फळबाग बाधित होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्राकरिता एक वेळची विशेष बाब म्हणून केंद्र सरकारने मदत करावी, असा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे मंत्री गोगावले यांनी यावेळी सांगितले.

    या बैठकीत रोहयो विभागाचे सहसचिव अतुल कोदे, सहसचिव कैलास साळुंके, फलोत्पादन विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे, फलोत्पादन संचालक जीवन बुंदे, व्हीबी जीरामजी योजनेच्या आयुक्त अनिता मेश्राम (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) आदी उपस्थित होते.

    00000

    - Advertisement -