शेतकरी बांधवांनो, हवालदिल होऊ नका, शासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले – महासंवाद

    - Advertisement -

    लातूर, दि. १०: दुष्काळामुळे ओढवलेले संकट मोठे असले तरी शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये, राज्य शासन पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे. पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडून थेट भरीव मदत देण्यासोबतच, पीक विमा कंपनीकडूनही जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. तसेच, शेतकरी बांधवांनी खचून जाऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पालकमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यातील दुष्काळ व पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विविध ठिकाणी भेटी दिल्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत धीर दिला.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः दुष्काळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लातूरसह मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यानंतर तातडीने दुष्काळ जाहीर करून विविध सवलती आणि उपाययोजना लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसेच या संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, दुष्काळी उपाययोजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे. या संकटकाळात सर्व मंत्री, आमदार यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांना धीर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे या संकटकाळात शेतकरी एकटा नाही, तर राज्य शासन व सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्या सोबत आहेत, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

    पालकमंत्र्यांनी अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी आणि चाकूर तालुक्यातील आष्टा मोड येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.  तत्पूर्वी उदगीर तालुक्यातील शेकापूर येथे आमदार संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत त्यांनी सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा आढावा घेतला. याप्रसंगी तेथील वयोवृद्ध शेतकरी व महिलांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी व नुकसानीची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर जळकोट तालुक्यातील बेळसांगवी येथेही पालकमंत्र्यांनी तूर आणि सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

    एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

    शेतकऱ्यांवर आलेल्या या नैसर्गिक संकटाची शासनाला पूर्ण जाणीव आहे. सध्या केंद्रीय पथक राज्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असून मराठवाड्यात गेली दोन दिवस विविध ठिकाणी या पथकाने पाहणी केली आहे. या पथकाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून लवकरच मदतीबाबत घोषणा होईल. या संकट काळात एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, याबाबत कृषि, महसूल विभागाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये, असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

    पाणी आणि चारा उपलब्धतेसाठी उपाययोजना

    आगामी काळातील पाणी टंचाईची संभाव्य तीव्रता लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येत आहेत. विंधन विहिरी, जुन्या विहिरींची दुरुस्ती करण्यासह पाण्याच्या पर्यायी स्त्रोतांची माहिती संकलित केली जात आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच चाऱ्याचे नियोजन करण्यात येत असून पुरेसा चारा उपलब्धतेसाठीही पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत, असे पालकमंत्री म्हणाले.

    दुष्काळ जाहीर झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या सवलतींची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफीबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागांत पाहणी दौरा करत असल्याचे सांगत, जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

    पालकमंत्री भोसले यांनी लातूर तालुक्यातील कोळपा आणि महाराणा प्रतापनगर येथील पीक नुकसानीचीही पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. या पाहणी दौऱ्यादरम्यान लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे आणि अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी पीक नुकसानीची सद्यस्थिती व सुरू असलेल्या पंचनाम्यांच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती पालकमंत्र्यांना दिली.

    जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा पाटील, उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिरादार, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सूरज पाटील, लातूर पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, प्रा. दिलीप मटके, मुकेश भालेराव, प्रफुल्लचंद्र गुंदरे, भानुदास पोटे, अश्विन नागराळे, चाकूर पंचायत समिती उपसभापती भुजंग शिंदे, जळकोटचे उपनगराध्यक्ष मन्मथअप्पा किडे, माजी आमदार बब्रुवान खंदारे, गणेश हाके, अजित पाटील कव्हेकर, हृषीकेश कराड यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी या दौऱ्यात उपस्थिती होते.

    *****

     

    - Advertisement -