
मुंबई, दि. ३० : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील नवीन नाट्यसंहितांचे परीक्षण करण्यात आले असून, उत्कृष्ट नाट्यलेखनासाठी नाट्यलेखकांना पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
प्राथमिक फेरीतील नवीन नाट्यसंहितांच्या परीक्षणानंतर ‘इम्युनिटी (द व्हॉईस ऑफ टॉलरन्स)’ या नाट्यसंहितेसाठी डॉ. सोमनाथ सोनवलकर यांना प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले असून, त्यांना रु. ६०,०००/- रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. ‘लुई दागेरी ते पिकासो’ या नाट्यसंहितेसाठी डॉ. श्याम शिंदे यांना द्वितीय पारितोषिक रु. ४०,०००/-, तर ‘मिसेस हिटलर’ या नाट्यसंहितेसाठी रोहन टिल्लू यांना तृतीय पारितोषिक रु. २०,०००/- जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्राला नाट्यकलेची समृद्ध आणि प्रदीर्घ परंपरा लाभली असून, राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांच्या माध्यमातून विविध विषयांवरील दर्जेदार नाट्यलेखनाला प्रोत्साहन मिळते. नवीन नाट्यसंहितांच्या माध्यमातून समकालीन विषय, सामाजिक वास्तव आणि विविध मानवी पैलू रंगभूमीवर प्रभावीपणे मांडले जातात. अशा नाट्यलेखनाची दखल घेऊन नाट्यलेखकांच्या सर्जनशील योगदानाचा गौरव करणे हा या पारितोषिकांचा प्रमुख उद्देश आहे.
६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील नवीन नाट्यसंहितांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून करण्यात आले. त्यातून उत्कृष्ट लेखन, आशय, मांडणी आणि नाट्यगुणांचा विचार करून वरील नाट्यसंहितांची पारितोषिकांसाठी निवड करण्यात आली आहे. या पारितोषिकांमुळे नाट्यलेखकांना प्रोत्साहन मिळून मराठी रंगभूमीसाठी दर्जेदार आणि आशयपूर्ण नवीन नाट्यलेखनाला चालना मिळणार आहे.
ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यपरंपरेचे जतन, संवर्धन आणि विकास करण्यासोबतच नव्या पिढीतील नाटककार, कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध नाट्यविषयक स्पर्धा व उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
या पारितोषिकप्राप्त नाट्यसंहितांचे लेखक आणि त्यांच्या सर्जनशील लेखनाचा गौरव ‘नाट्यगौरव’ राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास नाट्यलेखक, कलाकार, दिग्दर्शक, रंगकर्मी तसेच नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारितोषिकप्राप्त कलावंतांचा गौरव आणि मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
000
संजय ओरके/विसंअ

WhatsApp