अर्बन हाट, बेलापूर येथे ३ नोव्हेंबरपासून ‘उमेद दिवाळी फराळ महोत्सव’ – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ३० : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने ३ ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बेलापूर येथील प्रसिद्ध ‘अर्बन हाट’ येथे सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत  भव्य ‘दिवाळी फराळ महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना त्यांच्या समक्ष तयार केलेला  शुद्ध आणि ताजा फराळ उपलब्ध होणार आहे.

    शेतकरी महिलांच्या शेतातून थेट कच्चा माल

    अर्बन हाट, बेलापूर रेल्वे स्टेशन जवळ, नवी मुंबई येथे होणा-या  या महोत्सवातील फराळाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. फराळ बनवण्यासाठी लागणारा सर्व कच्चा माल, तेल, बेसन व इतर साहित्य, हे थेट शेतकरी महिलांच्या शेतातून आलेले आहे. त्यामुळे या फराळामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसून ग्राहकांना अस्सल व शुद्धतेची पूर्ण हमी मिळणार आहे.

    मागणीनुसार साजूक तूप किंवा शेंगदाणा तेलातील फराळ

    अनेकदा बाजारात आधीच पॅकबंद केलेला फराळ मिळतो. मात्र, या महोत्सवात महाराष्ट्रातील बचत गटाच्या उत्कृष्ट फराळ बनविणाऱ्या महिला ग्राहकांच्या समक्ष गरमागरम आणि खमंग चकल्या, लाडू, करंज्या व चिवडा इत्यादि  तयार करून देणार आहेत. अत्यंत महत्वाची बाब म्हणजे, ग्राहकांच्या आवडीनुसार व मागणीनुसार साजूक तुपातील किंवा शेंगदाणा तेलातील फराळ बनवून मिळण्याची विशेष सोय येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांना जर स्वत: चा फराळ बनविण्यात सहभाग घ्यायचा असेल तर तशी संधी इथे उपलब्ध असेल.

    स्वच्छता आणि आरोग्याची पूर्ण काळजी

    महोत्सव परिसरात आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून कडक नियमांचे पालन केले जात आहे. फराळ तयार करणाऱ्या महिला हॅन्ड ग्लव्हज, ऍप्रन आणि हेअर कॅप घालून पूर्ण स्वच्छतेत हा फराळ बनवतील.

    नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

    महिला सक्षमीकरणाला हातभार लावत आरोग्यदायी आणि अस्सल चवीची दिवाळी साजरी करण्यासाठी नवी मुंबई व परिसरातील नागरिकांनी बेलापूर रेल्वे स्टेशनजवळील ‘अर्बन हाट’ येथील या फराळ महोत्सवाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन उमेद अभियानातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीधर डुबे पाटील यांनी केले आहे.

    000

    वंदना थोरात/विसंअ

     

     

     

    - Advertisement -