
बीड, दि. ३ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी आज बीड मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन तेथील विविध सुविधांची पाहणी केली. बसस्थानकातील प्रसाधनगृहे, चालक-वाहक विश्रांतीगृह, उपाहारगृह आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांमधील त्रुटी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले.
प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची प्राथमिक जबाबदारी आहे. बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला चांगला अनुभव मिळावा, तसेच चालक आणि वाहकांनाही आवश्यक विश्रांतीच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या मोफत वाचनालयाचीही त्यांनी पाहणी केली. या वाचनालयाची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. वाचनालयाची अशी अवस्था असणे योग्य नसल्याचे सांगत, ते तातडीने सुरू करून प्रवाशांसह नागरिकांना वाचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बसस्थानकातील सुविधा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रवाशांच्या उपयोगाच्या ठरल्या पाहिजेत. त्यासाठी नियमित देखभाल, स्वच्छता आणि सुविधांच्या दर्जावर काटेकोर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मंत्री सरनाईक यांनी यावेळी अधोरेखित केले.
या पाहणीदरम्यान संबंधित अधिकारी उपस्थित होते.
००००

WhatsApp