‘दिवाळी आपल्या दारी’ उपक्रम : भाऊबीजेनिमित्त पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकल वाटप – महासंवाद

    - Advertisement -

    छत्रपती संभाजीनगर, दि. ११(जिमाका)- ‘दिवाळी आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत भाऊबीजेनिमित्त ग्रामपंचायत वडगाव कोल्हाटी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले.

     

    ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करताना होणारा त्रास कमी व्हावा, त्यांचा वेळ वाचावा आणि शिक्षणात सातत्य राहावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

    विद्यार्थिनींनी या सायकलचा वापर करून आपले शाळेतील येण्या-जाण्याच्या वेळेत बचत करून अभ्यासाचा वेळ वाढवावा आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी विद्यार्थिनींना केले.

    याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी उपस्थित मान्यवरांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.

    सायकली मिळाल्याने विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

    याप्रसंगी पालकमंत्री शिरसाट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा. उच्च शिक्षण घेऊन आपले, आपल्या कुटुंबाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे. आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या विकसित भारताचे शिल्पकार आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून देश घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीने पुढे जावे, असे आवाहन केले.

     

    सरपंच सुनील काळे, पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब गाढे, पंचायत समिती सदस्य मोहिनी ढमढरे, स्वप्नील अडसूळ, योगेश साळे, रमेश पाटील, संतोषसिंग ठाकूर यांच्यासह माजी महापौर नंदकुमार घोडेले, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    प्रास्ताविक पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब गाढे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक राहुल मांडे यांनी केले, तर  महेंद्र बारवाल यांनी केले.

    - Advertisement -