क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त नाशिक जिल्ह्यात १८ नोव्हेंबरपर्यंत जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह – महासंवाद

    - Advertisement -

    नाशिक, दि. ११ नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी समाजाचे महानायक, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती अर्थात जनजातीय गौरव दिवसानिमित्त जिल्ह्यात आजपासून राज्य शासनाच्या वतीने १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देतानाच त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाला चालना देण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

    या सेवा सप्ताहात जिल्हा व तालुकास्तरावर विविध शासकीय कार्यक्रम, पत्रकार परिषद, जनजागृती मोहीम, लाभार्थी मेळावे, आरोग्य शिबिरे, कागदपत्र सेवा शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

    या सप्ताहात १२ नोव्हेंबर रोजी अनुसूचित जमातीबहुल तालुक्यांच्या मुख्यालयांमध्ये पत्रकार परिषदांच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न आणि शासकीय योजनांची माहिती देण्यात येईल.

    शासनाच्या योजनांचा लाभ थेट आदिवासी बांधवांपर्यंत

    जिल्ह्यात १३ नोव्हेंबर रोजी न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना धनादेश वितरण करण्यात येणार आहे. तसेच धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA-JGUA), प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN), महिला बचत गट आणि विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. कृषीपूरक व्यवसाय, शेतीसाठी आवश्यक साधने, सिंचन सुविधा, स्वयंरोजगार व आर्थिक स्वावलंबनासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

    १४ नोव्हेंबर रोजी आदिवासी स्मारके आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व देखभाल करण्यात येणार आहे. सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन करून आदिवासी देव-देवता, पूजापद्धती, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मितेचे दर्शन घडविण्यात येईल.

    भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी होणार

    १५ नोव्हेंबर रोजी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा व तालुकास्तरावर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना माल्यार्पण, अभिवादन, आदिवासी महापुरुषांचा गौरव, समाजसेवकांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

    आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराला विशेष प्राधान्य

    १६ नोव्हेंबर रोजी आधार कार्ड व शासकीय कागदपत्र सेवा शिबिर आयोजित करून नागरिकांना आधार कार्ड दुरुस्ती, अद्ययावतीकरण, वनपट्टेधारकांना लाभवाटप आणि विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

    १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर, रक्तदाब, मधुमेह व इतर प्राथमिक आरोग्य तपासण्या, माता-बाल आरोग्य, पोषण आणि सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक पौष्टिक आहार, कडधान्ये आणि भरडधान्यांचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे.

    १८ नोव्हेंबर रोजी आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिन व सप्ताहाच्या समारोपानिमित्त महिला बचत गट, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, शिष्यवृत्ती, व्यावसायिक शिक्षण, कृषी योजना आणि डिजिटल आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

    आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा गौरव

    आदिवासी समाजाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोककला, लोकनृत्य, लोकगीते, पारंपरिक ज्ञान आणि ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक मेळावे, क्रीडा स्पर्धा, शोभायात्रा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. आदिवासी महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता, सुशोभीकरण, दीपोत्सव तसेच ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यावरही भर देण्यात येणार आहे. याशिवाय भगवान बिरसा मुंडा आणि इतर आदिवासी नायकांच्या जीवनकार्यावर आधारित लेख, व्हिडिओ, पॉडकास्ट आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

    या संपूर्ण सेवा सप्ताहाचे नियोजन सर्व संबंधित शासकीय विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून करण्यात येणार आहे.

    “आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास, त्यांच्या हक्कांचे संरक्षण, शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ आणि आदिवासी संस्कृती व अस्मितेचे जतन हे शासनाचे प्राधान्य आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांतून प्रेरणा घेत जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह हा केवळ उत्सव न राहता आदिवासी बांधवांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणारा लोकसहभागाचा उपक्रम ठरावा,” असे आवाहनही पालकमंत्री महाजन यांनी केले.

    ०००००

    - Advertisement -