क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक ओझरखेड धरणाजवळ साकारणार – पालकमंत्री गिरीश महाजन यांची पत्रकार परिषदेत माहिती – महासंवाद

    - Advertisement -

    नाशिक, दि. ११ नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा): क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजातीय गौरव दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त नाशिक जिल्ह्यात आजपासून जनजातीय गौरव सेवा सप्ताह साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ओझरखेड धरणाजवळ पाच एकर क्षेत्रात भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक साकारण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

    आदिवासी आयुक्तालय येथे आज दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), डॉ. कश्मिरा संख्ये, महानगरपालिका स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

     

    पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले की, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजाचे नेते नव्हते, तर ते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान क्रांतिकारक होते. जल, जंगल, जमीन या आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी संघर्ष केला. ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीविरोधात त्यांनी आदिवासी समाजाला संघटित करून लढा दिला. त्यांचे बलिदान संघर्ष, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचे कार्य आजही संपूर्ण देशाला प्रेरणा देणारे आहे. यंदा भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती आहे.

    दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळ भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक साकारण्यात येणार आहे. या धरण परिसरातील पर्यटन सुविधांचा विकास आणि क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची उभारणी या कामासाठी चार कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तेथे २१ फूट उंच पुतळ्यासह वृक्षारोपण करण्यात येईल. यामुळे ओझरखेड धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टिने विकसित होण्यास मदत होईल. तसेच स्थानिक पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.

    जिल्हा विकास आराखड्यांतर्गत जिल्ह्याला प्रोत्साहनात्मक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचा, आदिवासी समाजाच्या संघर्षाचा आणि देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव होणार आहे.

    आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, अगदी दुर्गम पाड्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विशेष सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ, आवश्यक कागदपत्रे, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी आणि आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

    आदिवासी भागाचा विकास करताना रस्ते, पाणी, वीज यांसारख्या पायाभूत सुविधांबरोबरच प्रत्येक पात्र कुटुंबाला वैयक्तिक लाभाच्या योजनांचाही फायदा मिळणे आवश्यक आहे. घरकुल, शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती आणि आर्थिक सक्षमीकरणाशी संबंधित योजनांची माहिती व लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन विशेष प्रयत्न करीत आहे. सेवा सप्ताहाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा थेट आदिवासी बांधवांच्या दारापर्यंत पोहोचणार आहे.
    राज्य शासनाच्या ॲस्ट्रो टुरिझम धोरणांतर्गत सुरगाणा तालुक्यातील उधमाळ या ठिकाणाचा विकास करण्यता येत आहे. लोकसंख्या कमी आहे म्हणून कोणत्याही नागरिकाला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात येणार नाही.

    या सप्ताहात न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण, स्मारकांची स्वच्छता आणि दीपोत्सव, आधार कार्ड व शासकीय कागदपत्रे सेवा शिबिर, आरोग्य व पोषण जनजागृतीपर शिबिर, आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिवस साजरा होईल.

    जनजातीय गौरव दिवस सप्ताह आदिवासी समाजाच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणारा उपक्रम ठरणार आहे. यासाठी सर्व शासकीय विभाग, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रित सहभागातून काम करतील. योजनांची माहिती देण्याबरोबरच पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे आणि त्यांच्या समस्या जागेवरच सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, असा विश्वास पालकमंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला.

    आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती बनसोड यांनी शबरी नॅचरल या ब्रँडच्या डिझाईनला मिळालेल्या पुरस्काराची माहिती दिली, तर जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी उधमाळ येथे विकसित होणाऱ्या ॲस्ट्रो टुरिझम धोरणाची सविस्तर माहिती दिली.

    ००००००

    - Advertisement -