
रायगड-अलिबाग,दि.१२ : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा” यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल-जंगल-जमीन यांच्या रक्षणासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचा त्याग, संघर्ष आणि समाजसुधारणेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. केंद्र शासनाने दि. 12 नोव्हेंबर, 2021 च्या अधिसूचनेनुसार क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर “जनजातीय गौरव दिन’ साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून याबाबतची माहिती जिल्ह्यातील आदिवासी समाजातील बांधवांपर्यंत पोहचवावी असे निर्देश राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकासमंत्री तथा पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे,जिल्हा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण श्रीमती तेजस्विनी गलांडे आदि उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन पालकमंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले की, जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान देणारे महान क्रांतिकारक क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती जिल्ह्यात दि.11 नोव्हेंबर ते दि.18 नोव्हेंबर 2026 या कालावधीत”जनजातीय गौरव सेवा सप्ताह-2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणी व समन्वयासाठी आदिवासी विकास विभाग हा नोडल विभाग म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. शुक्रवार दि.13 नोव्हेंबर 2026 रोजी लाभ वाटप व आर्थिक सक्षमीकरण दिवस असून न्यूक्लियस बजेट तसेच इतर विभागाच्या योजनेत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना धनादेश वाटप व नवीन अर्जाचे वितरण/स्वीकृती करण्यात येणार आहे. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA JGUA), प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM JANMAN) आणि महिला बचत गटांना थेट लाभ वाटप करण्यात येणार आहे स्वयंरोजगार, व्यवसाय, कृषीपूरक व्यवसाय, शेतीची साधने व सिंचन सुविधांबाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन व समन्वय साधण्यात येईल.
शनिवार दि.14 नोव्हेंबर 2026 रोजी स्मारक स्वच्छता, दीपोत्सव व संस्कृती दर्शन कार्यक्रम असल्याने आदिवासी स्मारके व पुतळ्यांची स्वच्छता व सायंकाळी दीपोत्सव आयोजन तसेच आदिवासी देव-देवता, पूजा पद्धती, परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणानी करायचे आहे.
रविवार दि.15 नोव्हेंबर 2026 क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचया 151 व्या जयंतीनिमित्ताने जिल्हा व तालुका स्तरावर भगवान बिरसा मुंडा व स्थानिक आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण कार्यक्रम करावयाचे आहे. राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमामध्ये गडचिरोली येथे मा. राज्यपाल महोदय, मा. मुख्यमंत्री महोदय आणि मा. उपमुख्यमंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम पार पडणार आहेत. यामध्ये भगवान बिरसा मुंडा आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान केले जातील. गेल्या 12 वर्षांतील पद्म पुरस्कार विजेते, ‘मन की बात’ मधील उल्लेखित आदिवासी समूह, सामाजिक नायक, समाजसेवक, बुद्धिजीवी व स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सोमवार दि.16 नोव्हेंबर, 2026 रोजी आधार व शासकीय कागदपत्रे सेवा शिबिर, आधारकार्ड दुरुस्ती व अद्ययावतीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच वनपट्टेधारकांना विविध लाभ वाटप, कृषी विभागाच्या ऑनलाईन सेवा, शेतकरी नोंदणी व पीकविमा मार्गदर्शन केले जाणार आहे.
मंगळवार, दि.17 नोव्हेंबर 2026 रोजी आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरमोफत आरोग्य तपासणी (रक्तदाब, मधुमेह) व सिकलसेल आजार जनजागृती व तपासणी करण्यात येणार आहे. माता-बाल आरोग्य, पोषणबाग, परसबाग आणि पौष्टिक तृणधान्ये/कडधान्यांच्या वापराबाबत मार्गदर्शन.विद्यापीठ स्तरावर अध्यासन केंद्रामार्फत विशेष कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. बुधवार, दि.18 नोव्हेंबर 2026 रोजी कार्यक्रमाचा समारोप होईल.
००००ृ

WhatsApp