महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिवीरांचे योगदान – महासंवाद

    - Advertisement -

    ‘आदिवासी’ हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर एक आगळीवेगळी संस्कृती उभी राहते. आदिवासी जमातींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण प्रथा, परंपरा, संस्कृती आणि जीवनशैली आढळून येते. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि गुणवैशिष्ट्ये आजही आदिवासी बांधवांकडून जपली जात आहेत. सामूहिक जीवनपद्धती, एकत्रित निर्णयप्रक्रिया, गरजेपुरते उत्पादन घेणे आणि जंगलाचे संरक्षण करणे अशा अनेक अनुकरणीय प्रथा व परंपरा आदिवासी समाजाने जपल्या आहेत.

    भारताच्या आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक महनीय व्यक्तींनी योगदान दिले. यामध्ये आदिवासी समाजाचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले आहे. ब्रिटिश राजवटीविरुद्ध आदिवासी समाजाने केवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठीच नव्हे, तर जल, जंगल, जमीन, सामाजिक न्याय आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठीही संघर्ष केला. आदिवासी समाजातील अनेक क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. काहींनी दीर्घकाळ संघर्ष करून ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांना तीव्र विरोध केला. या संघर्षात अग्रणी असलेल्या धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांनी ‘उलगुलान’चा नारा देत आदिवासी समाजाला संघटित केले. छोटानागपूर परिसरातील आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी व्यापक आंदोलन उभारले. सन १८९४ मध्ये वनशुल्क माफीसाठी आंदोलन करून त्यांनी आदिवासींच्या न्याय्य हक्कांचा आवाज बुलंद केला.

    दुष्काळाच्या काळात जनतेसाठी केलेल्या कार्यामुळेही त्यांच्याविषयी आदिवासी समाजात आदराची भावना निर्माण झाली. त्यांचे कार्य आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी ठरले. महाराष्ट्रातील अनेक आदिवासी क्रांतिकारकांनीही ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. त्यांपैकी काही प्रमुख क्रांतिवीरांचे योगदान पुढीलप्रमाणे आहे. आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवगाव येथे १८०५ साली महादेव कोळी जमातीत जन्मलेल्या स्वाभिमानी राघोजी भांगरे यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारले. सन १८३८ मध्ये रतनगड आणि परिसरातील किल्ल्यांच्या भागात त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध मोठा उठाव केला. आपण शेतकरी व गोरगरिबांचे कैवारी असून जुलमी सावकार आणि ब्रिटिश सत्तेचे विरोधक आहोत, अशी त्यांची ठाम भूमिका होती. नोव्हेंबर १८४४ ते मार्च १८४५ या काळात राघोजी भांगरे यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष अधिक तीव्र झाला. त्यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान देत आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिला.

    अखेर ब्रिटिशांनी त्यांना अटक करून ठाणे येथे नेले. २ मे १८४८ रोजी ठाणे येथील कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी संघर्ष करणारे राघोजी भांगरे यांचे योगदान महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वपूर्ण आहे. क्रांतिवीर खाज्या नाईक भिल्ल समाजातील क्रांतिवीर खाज्या नाईक यांनी खान्देश परिसरातील ब्रिटिशविरोधी आदिवासी उठावाचे नेतृत्व केले. ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांना विरोध करून त्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष केला. आदिवासी प्रदेशातून होणाऱ्या व्यापारावरील कराचा लाभ स्थानिक आदिवासींना मिळाला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. सन १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात खाज्या नाईक यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष तीव्र केला. सेंधवा घाट परिसरात ब्रिटिशांचा खजिना लुटल्याच्या घटनेनंतर ब्रिटिशांनी त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडली. आंबापाणीच्या जंगलात खाज्या नाईक आणि त्यांच्या साथीदारांनी आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या ब्रिटिश सैन्याशी शर्थीची झुंज दिली. सन १८५८ मध्ये झालेली आंबापाणीची लढाई खान्देशातील आदिवासींच्या ब्रिटिशविरोधी संघर्षाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण मानली जाते. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणाऱ्या खाज्या नाईक यांचा संघर्ष मोडून काढण्यासाठी इंग्रजांनी विविध प्रयत्न केले. अखेर सन १८६० मध्ये कपटाने त्यांची हत्या करण्यात आली.

    आदिवासी समाजात दहशत निर्माण करण्यासाठी त्यांचे शिर कापून जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे झाडाला आठवडाभर टांगून ठेवल्याचा उल्लेख ऐतिहासिक संदर्भांमध्ये आढळतो. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे खाज्या नाईक हे आदिवासी समाजाच्या शौर्याचे प्रतीक ठरले. वीर बाबुराव शेडमाके १२ मार्च १८३३ रोजी जन्मलेले वीर बाबुराव शेडमाके हे चंद्रपूर परिसरातील गोंड समाजाचे महान आदिवासी क्रांतिकारक होते. त्यांनी ब्रिटिश अंमलाखालील चंद्रपूर परिसरात इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. सन १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात सुमारे ५०० आदिवासी युवकांना एकत्र करून त्यांनी सैन्य उभारले आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध हल्ले चढवून इंग्रजांना जेरीस आणले. २९ एप्रिल १८५८ रोजी बाबुराव शेडमाके यांनी आपल्या सैन्यासह अहेरी परिसरातील चिचगुडी येथील ब्रिटिशांच्या तारयंत्र छावणीवर हल्ला केला. या हल्ल्यात ब्रिटिशांचे दोन तारयंत्र कर्मचारी मारले गेले. बाबुराव शेडमाके यांना पकडण्यात अपयश येत असल्यामुळे इंग्रजांनी कूटनीतीचा अवलंब केला. अखेर १८ सप्टेंबर १८५८ रोजी त्यांना अटक करून चांदा येथे आणण्यात आले. २१ ऑक्टोबर १८५८ रोजी ब्रिटिशांनी त्यांना फाशी दिली. अशा प्रकारे वीर बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याच्या स्मरणार्थ भारत सरकारने १२ मार्च २००९ रोजी विशेष टपाल तिकीट प्रसिद्ध करून त्यांचा गौरव केला. क्रांतिवीर शामा दादा कोलाम यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव परिसरात २६ नोव्हेंबर १८९९ रोजी कोलाम जमातीत जन्मलेले शामा दादा कोलाम हे आदिवासी समाजातील एक संघर्षशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. गरिबांचे कैवारी आणि धनदांडग्यांचा कर्दनकाळ अशी त्यांची ओळख होती. त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या काळात निजामशाहीविरुद्ध सशस्त्र संघर्ष केला. इंग्रज, निजामशाही आणि जुलमी सावकारांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली. गोरगरिबांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी शोषण व्यवस्थेला आव्हान दिले. धनदांडग्यांकडून संपत्ती हस्तगत करून गरिबांना मदत करत असल्यामुळे त्यांना ‘विदर्भाचे रॉबिनहुड’ म्हणून संबोधले जात असे. शोषित आणि वंचित समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या शामा दादा कोलाम यांच्या कार्याला आदिवासी समाजाच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे.

    सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा त्यांच्या संघर्षातून मिळते. क्रांतिवीर नाग्या महादू कातकरी रायगड जिल्ह्यातील चिरनेर गावातील आक्कादेवी कातकरीवाडी येथील नाग्या महादू कातकरी हे आदिवासी समाजातील एक शूर क्रांतिकारक होते. सन १९३० मध्ये महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केल्यानंतर देशभरात सविनय कायदेभंग चळवळीला गती मिळाली. याच काळात रायगड जिल्ह्यात ब्रिटिशांच्या अन्यायकारक वनकायद्यांविरुद्ध जंगल सत्याग्रह उभारण्यात आला. आदिवासी समाजाच्या उपजीविकेवर निर्बंध आणणाऱ्या ब्रिटिशांच्या वनकायद्यांना नाग्या कातकरी यांनी विरोध केला. जंगलातील गवत कापण्यावर घालण्यात आलेली बंदी झुगारून त्यांनी आपल्या साथीदारांसह जंगल सत्याग्रहात सहभाग घेतला. ब्रिटिशांच्या अन्यायकारक कायद्यांविरुद्धचा हा संघर्ष आदिवासी समाजाच्या पारंपरिक हक्कांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरला. २५ सप्टेंबर १९३० रोजी चिरनेर येथील जंगल सत्याग्रह मोडून काढण्यासाठी ब्रिटिश पोलिसांनी आंदोलकांवर निर्दयी गोळीबार केला. या गोळीबारात नाग्या महादू कातकरी यांच्यासह एकूण आठ सत्याग्रहींना हौतात्म्य प्राप्त झाले. अत्यंत तरुण वयात त्यांनी समाजाच्या हक्कांसाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचे कार्य आदिवासी समाजाच्या शौर्यशाली इतिहासातील प्रेरणादायी अध्याय आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा केवळ काही मोजक्या क्रांतिकारकांचा इतिहास नाही. या इतिहासात आदिवासी समाजातील असंख्य ज्ञात-अज्ञात वीर-वीरांगनांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

    आदिवासी समाजातील क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध विविध मार्गांनी संघर्ष केला. ब्रिटिशांच्या अन्यायकारक कायद्यांना विरोध केला, जंगल आणि जमिनीवरील पारंपरिक अधिकारांच्या संरक्षणासाठी लढा उभारला, तसेच सावकार आणि जमीनदारांच्या शोषणाविरुद्ध संघर्ष केला. आदिवासी क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे पुढील पिढ्यांमध्ये स्वातंत्र्य, समानता आणि स्वाभिमानाची भावना अधिक दृढ झाली. आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक योगदानाला योग्य स्थान मिळणे आवश्यक आहे. या योगदानाचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे आणि क्रांतिवीरांच्या कार्याचे स्मरण करणे ही केवळ इतिहासाची गरज नसून आपली सामाजिक जबाबदारीही आहे. आदिवासी समाजाने स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान, केलेला त्याग आणि अन्यायाविरुद्ध उभारलेला संघर्ष हा भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील अभिमानास्पद वारसा आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करणे म्हणजे केवळ त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे नव्हे, तर त्यांनी दाखविलेल्या सामाजिक न्याय, स्वाभिमान, एकता आणि हक्कांच्या संरक्षणाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करणे होय. त्यांच्या विचारांचा आणि आदिवासी क्रांतिवीरांच्या संघर्षाचा वारसा जतन करणे, त्यातून प्रेरणा घेणे आणि सामाजिक समतेच्या दिशेने वाटचाल करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

    हितेश एच. वाळले (संशोधन अधिकारी)

    अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती,

    किनवट मुख्यालय : छत्रपती संभाजीनगर

    ००००

    - Advertisement -