
मुंबई, दि. १३: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखे आणि मराठा साम्राज्याच्या शौर्यपरंपरेची साक्ष देणाऱ्या दुर्मिळ शस्त्रांचा समावेश असलेल्या ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या आंतरराष्ट्रीय शस्त्रप्रदर्शनाच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्याचे उद्घाटन आज (शुक्रवार, १३ रोजी) सायंकाळी ४.३० वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई येथे होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त जून २०२३ ते जून २०२४ या कालावधीत राज्यभर विविध उपक्रम पार पडले. महाराजांचे उत्तुंग कर्तृत्व आणि स्वराज्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग, पोवाडे, किल्ल्यांवरील प्रदर्शने, पारंपरिक युद्धकलांची प्रात्यक्षिके तसेच ऐतिहासिक शस्त्रास्त्रांची प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमांमधील महत्त्वाचा टप्पा म्हणजे लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट (V&A) संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक वाघनखे प्रदर्शनासाठी भारतात आणण्याबाबत झालेला यशस्वी करार होय.
मराठा योद्ध्यांचा पराक्रम आणि त्यांच्या युद्धपरंपरेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘मराठा व समकालीन शस्त्रे’ या संकल्पनेवर आधारित ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ हे प्रदर्शन साकारण्यात आले आहे. सोळाव्या ते अठराव्या शतकातील भारतीय, विशेषतः मराठा आणि समकालीन शस्त्रास्त्रांना सांस्कृतिक व शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मराठा योद्धे आणि त्यांच्या शस्त्रपरंपरेला मानवंदना देण्यासाठी या प्रकल्पाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ हे नाव देण्यात आले.
या प्रदर्शनाचे पहिले पर्व ४ जुलै २०२४ ते ३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा येथे, दुसरे पर्व ७ फेब्रुवारी ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर येथे, तर तिसरे पर्व ३ ऑक्टोबर २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राजर्षी शाहू महाराज छत्रपती जन्मस्थळ संग्रहालय, कोल्हापूर येथे यशस्वीरीत्या पार पडले. या तिन्ही ठिकाणी इतिहासप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या संदर्भयुक्त द्विभाषिक शस्त्रसूचींमुळे या उपक्रमाला संशोधन आणि शैक्षणिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.
मुंबईतील अंतिम टप्प्यात ‘अटक ते कटक’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या छत्रपतींनी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पराक्रमी सेनानींनी स्वराज्याचा वारसा जपत मराठा साम्राज्याचा विस्तार देशाच्या विविध भागांत केला. मराठा साम्राज्याची पताका अटकेपार पोहोचविणारे रघुनाथराव पेशवे आणि कटकपर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे सेनासाहेबसुभा रघुजी भोसले यांच्या शौर्याची साक्ष देणारी शस्त्रे या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.
मुंबईतील प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या संग्रहातील निवडक समकालीन शस्त्रांसह विविध शासकीय संग्रहालयांमधील अग्निबाण, इटा, पट्टा आणि काटेरी माडू यांसारखी दुर्मिळ शस्त्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक वाघनखे, रघुनाथराव पेशवे यांची फिरंगी तलवार, सेनासाहेबसुभा रघुजी भोसले यांची तलवार, खंडेराव गायकवाड यांची ढाल आणि सरदार रास्ते घराण्यातील पट्टा अशी ऐतिहासिक महत्त्व असलेली मराठा शस्त्रे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी प्रथमच मुंबईकरांना मिळणार आहे.
याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या संग्रहातील छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन चित्र, सोन्याचे होन हे नाणे आणि विजयदुर्ग किल्ल्याचा अस्सल नकाशा ही प्रदर्शनाची विशेष आकर्षण असणार आहेत.
कोल्हापूरनंतर आता राजधानी मुंबईत हे प्रदर्शन होणार असल्याने इतिहासप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकांना मराठा साम्राज्याचा शौर्यशाली इतिहास जवळून अनुभवण्याची संधी मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा वीरवारसा आणि ऐतिहासिक शस्त्रपरंपरेची माहिती करून घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला देण्याचे आवाहन प्रदर्शनाचे संकल्पनाकार तथा पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी केले आहे.
०००
संजय ओरके/विसंअ

WhatsApp