नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडीच्या इमारती उत्कृष्ट – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

    - Advertisement -

    नंदुरबार, दि. १३: नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या नवनिर्मित इमारती राज्यातील उत्कृष्ट अंगणवाड्यांच्या इमारतींपैकी एक आहेत. या इमारतींमध्ये बालकांच्या शिक्षणासह पोषण, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्याने सुपोषणाच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

    जिल्हा परिषद,नंदुरबार व महिला व बालविकास विभाग यांच्या सहकार्याने  फिडींग इंडिया यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तळोदा तालुक्यातील मोरवड येथील प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडी इमारतींच्या लोकार्पणप्रसंगी महिला व बालविकास मंत्री तटकरे बोलत होत्या. यावेळी आमदार राजेश पाडवी, महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी पंकज पटले, तहसीलदार दीपक धीवरे, फीडिंग इंडियाचे वृषभ चोपडा, मोरवडच्या सरपंच अक्षता वळवी आदी उपस्थित होते.

    मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आधुनिक अंगणवाडी इमारतींच्या उद्घाटनासाठी भेटी दिल्या आहेत. मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी इमारती पाहिल्यानंतर त्यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. अंगणवाडी ही गावातील महत्त्वपूर्ण इमारत असून, बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे अंगणवाडी इमारतींमध्ये काळानुरूप बदल करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

    अंगणवाडीमध्ये बालकांसाठी हवेशीर वर्गखोल्या, पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी आवश्यक सुविधा, पौष्टिक आहार, सुसज्ज स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, खेळण्याच्या सुविधा आणि संरक्षक भिंत नंदुरबारमधील नव्या अंगणवाडी इमारतींमध्ये या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अंगणवाडी केंद्रे, जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत इमारत एकाच परिसरात असल्याने बालकांना सुरक्षित वातावरण मिळणार आहे.

    फीडिंग इंडिया संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या स्वयंपाकघराच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. महिलांनी कुटुंबाची काळजी घेतानाच स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. महिला सुदृढ असेल तर कुटुंब आणि पुढील पिढीही सुदृढ राहील. ‘सुदृढ पोषण, देश पोषण’ या संकल्पनेनुसार माता आणि बालकांचे पोषण महत्त्वाचे आहे. बालकाच्या आयुष्यातील पहिले एक हजार दिवस जितके महत्त्वाचे आहेत, तितकीच आई आणि वडील दोघांचीही जबाबदारी महत्त्वाची आहे. गरोदर महिलांना कुटुंबीयांनीही योग्य पोषण आहार देत त्यांची आवश्यक काळजी घ्यावी.

    जिल्ह्यातील कुपोषणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आरोग्य विभाग आणि महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले आहे. प्रत्यक्ष परिस्थिती समोर येणे आवश्यक आहे. वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच प्रभावी उपाययोजना करता येतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    नंदुरबार जिल्ह्यातील या आधुनिक अंगणवाडी इमारतींची छायाचित्रे आणि माहिती केंद्र शासनाच्या अहवालात समाविष्ट करण्यात येणार असून, अंगणवाडी पायाभूत सुविधा आणि कुपोषण निर्मूलनाच्या क्षेत्रातील जिल्ह्याचे काम देशपातळीवरील उत्कृष्ट कार्यपद्धती म्हणून समोर आणण्यासाठी विभाग प्रयत्नशील राहील, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

    आमदार राजेश पाडवी म्हणाले की, झोमॅटोच्या फीडिंग इंडिया उपक्रमांतर्गत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या आधुनिक अंगणवाड्यांमुळे बालकांना दर्जेदार पोषण आहार, खेळण्यासाठी चांगल्या सुविधा आणि सुरक्षित वातावरण मिळत आहे. त्यामुळे अंगणवाड्यांकडे बालकांचा ओढा वाढला असून, कुपोषण निर्मूलनासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. या उपक्रमाचा विस्तार संपूर्ण तळोदा तालुक्यात करून त्यानंतर शहादा तालुक्यासह जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागांमध्येही आधुनिक अंगणवाड्या उभाराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

    जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी म्हणाल्या की,बालकांच्या आयुष्यातील पहिले एक हजार दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. या कालावधीत बालकाच्या मेंदूचा 90 टक्क्यांपर्यंत विकास होत असल्याने बालकांसोबतच गरोदर आणि स्तनदा मातांच्या पोषणाकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी कुटुंबातील पुरुषांनीही महिलांच्या आरोग्याची आणि पोषणाची जबाबदारी घ्यावी. फीडिंग इंडिया उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्वयंपाकघरातून सध्या दररोज सुमारे 5 हजार 800 बालकांना दोन वेळेचा आहार दिला जात आहे. या स्वयंपाकघराच्या विस्तारीकरणानंतर डिसेंबरपासून जवळपास सुमारे 20 ते 25 हजार बालकांना भोजन उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी सांगितले.

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी फिल्डिंग इंडिया च्या उपक्रमाविषयी प्रास्ताविक माहिती दिली. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रधानमंत्री मातृत्व योजना, लेक लाडकी योजनाचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच बेबी केअर किट देण्यात आली.

    प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते तळोदा तालुक्यात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या आमलाड, तळवे, मोरवड, उमरी, मोड येथील प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडी इमारतींच्या लोकार्पण करण्यात आले. तसेच फीडिंग इंडिया  झोमॅटोच्या सेंट्रल किचनला मंत्री आदिती तटकरे यांनी भेट देवून माहिती जाणून घेतली.

    महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ईपीडीएस निर्मिती युनिटला भेट

    सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) अंतर्गत ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशन, महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील मध्यम कुपोषित बालकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या एनर्जी प्रोटीन डेन्स सप्लिमेंट ईपीडीएस मॅन्युफॅक्चरिंग युनिटला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भेट देऊन पाहणी केली.

    यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी ईपीडीएस निर्मिती युनिटमधील उत्पादन प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच कुपोषित बालकांना पोषणपूरक आहार उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची कार्यपद्धती जाणून घेतली.

    याप्रसंगी आमदार राजेश पाडवी, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी, परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी पंकज पटले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया गावित आदी उपस्थित होते.

     00000

    - Advertisement -