
मुंबई, दि. १५ : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आधार कार्ड दुरुस्ती व अद्ययावतीकरण विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापूरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड नोंदणी, आधार कार्डवरील नावातील दुरुस्ती, पत्ता, जन्मतारीख व मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे तसेच बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेषतः नोकरी व शिक्षणासाठी मुंबईत वास्तव्यास असलेल्या जनजातीय बांधवांना आणि विद्यार्थ्यांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे.
आधार कार्ड अद्ययावतीकरणासाठी येताना नागरिकांनी पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र यासारखे ओळखीचे प्रमाणपत्र तसेच पत्त्याचा पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहांतर्गत आयोजित या विशेष शिबिराचा मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र लाभार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी केले आहे.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ

WhatsApp