आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देऊ; शिक्षण, रोजगार व स्वावलंबनाच्या संधी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवू  – पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    - Advertisement -

    धुळे, दि. १५ नोव्हेंबर २०२६ : भगवान बिरसा मुंडा यांची जयंती हा केवळ स्मरणाचा नव्हे, तर आदिवासी अस्मितेचा अभिमान जागविण्याचा आणि उज्ज्वल भविष्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. जल, जंगल आणि जमिनीवरील हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या या महानायकाच्या विचारांचा वारसा पुढे नेत आदिवासी समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षण, युवकाला रोजगार, महिलेला स्वावलंबनाची संधी आणि प्रत्येक पात्र कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

    क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांच्या वतीने पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित जनजातीय गौरव दिन व महिला बचत गटांच्या महामेळाव्यात ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी धुळे मनपाच्या महापौर मायादेवी परदेशी, नगरसेविका वंदना भामरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, प्रांताधिकारी रोहन कुवर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित पाठक, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी पवन सोनोणे, कार्यक्रम समन्वयक कविता कोळी, आदी उपस्थित होते.पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष सामाजिक न्याय, सांस्कृतिक अस्मिता आणि स्वाभिमानाचा होता. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि एकजुटीच्या बळावर परिवर्तन घडविता येते, हा संदेश त्यांनी दिला. महाराष्ट्राचा विकास सर्वसमावेशक होण्यासाठी दुर्गम भागातील शेवटच्या आदिवासी कुटुंबाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. समाजाच्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान, आर्थिक पाठबळ आणि बाजारपेठेची जोड दिली पाहिजे.

    राज्यभर 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहातून शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर आहे. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानासह विविध योजनांतून आर्थिक सहाय्य, स्वयंरोजगार मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, सिकलसेल जनजागृती, पोषण व कौशल्य विकासाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. कार्यक्रमाचे यश गर्दीवर नव्हे, तर किती कुटुंबांना लाभ मिळाला, किती विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर झाल्या आणि किती महिला स्वावलंबी झाल्या, यावर मोजले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

    आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हा भक्कम पाया आहे. विद्यार्थ्यांनी डॉक्टर, अभियंते, प्रशासकीय अधिकारी, संशोधक, उद्योजक आणि खेळाडू होण्याची स्वप्ने पाहावीत. शालेय, उच्च व व्यावसायिक शिक्षणासह परदेशातील शिक्षणासाठीही पात्र विद्यार्थ्यांना शासकीय योजनांतून आर्थिक सहाय्याच्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून स्पर्धा परीक्षांत यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात राघोजी भांगरे गुणगौरव प्रोत्साहन बक्षीस योजनेसाठी 74 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. महामेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून आदिवासी भागातून विविध क्षेत्रांत सक्षम नेतृत्व घडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.आदिवासी महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य हे समाजाच्या प्रगतीचे महत्त्वाचे मोजमाप आहे. शेती, पशुपालन, वनउपज संकलन व घरगुती उद्योगांत योगदान देणाऱ्या महिलांनी बचतीपलीकडे जाऊन उद्योजकतेकडे वळावे. शेतीमाल व वनउपज प्रक्रिया, अन्नप्रक्रिया, हस्तकला आणि पारंपरिक खाद्यपदार्थांच्या व्यवसायातून उत्पन्नाच्या संधी निर्माण कराव्यात. त्यासाठी प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास शासन प्राधान्य देत आहे. महिला ही केवळ कुटुंबाचा आधार नसून समाजपरिवर्तनाची शक्ती आहे, असे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

    महामेळाव्यात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेशांचे वाटप करण्यात आले. महिला बचत गटांना स्वयंरोजगार व उद्योग उभारणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आदिवासी महिला, बालके व युवकांच्या आरोग्यासाठी पोषक आहार, नियमित तपासणी, सिकलसेल जनजागृती आणि आवश्यक उपचारांना प्राधान्य देण्याची गरजही पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली.

    कोणतेही मूल शिक्षणापासून, पात्र कुटुंब शासकीय योजनांपासून, महिला प्रगतीच्या संधींपासून आणि युवक रोजगार व कौशल्य विकासापासून वंचित राहणार नाही, असा संकल्प सर्वांनी करावा. यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नेतृत्वाने पुढाकार घ्यावा. भगवान बिरसा मुंडा यांनी ज्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला, त्या समाजाला शिक्षण, सन्मान, समान संधी आणि प्रतिष्ठेचे जीवन मिळवून देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे सांगून पालकमंत्री श्री. रावल यांनी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

    वनपट्टाधारकांना ई-सातबारा मिळणार :आमदार काशीराम पावरा

    वनपट्टाधारक आदिवासी बांधवांना ई-सातबारा देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला ई-सातबारा मिळावा, तसेच वैयक्तिक व सामूहिक शासकीय योजनांचा लाभ आदिवासी कुटुंबांपर्यंत पोहोचावा, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार काशीराम पावरा यांनी या महामेळाव्यात केले. आदिवासी बांधवांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहावे, असे सांगून त्यांनी आयोजनाबद्दल आदिवासी विकास विभागाचे कौतुक केले. जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचा समारोप 18 नोव्हेंबर रोजी शिरपूर येथे होणार असून, त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही आमदार श्री. पावरा यांनी केले.

    ००००

    - Advertisement -