विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत – महासंवाद

    - Advertisement -

    पंढरपूर, दि. २१ : पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे झालेल्या विहीर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना तसेच विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य शासन आणि शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. शासनाच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपये आणि शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी दोन लाख रुपये, अशी एकूण सात लाख रुपयांची मदत देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे संबंधित वारसांना मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
    आंबे येथील विहीर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींचे वारस म्हणून रांजणी येथील राधा मंगेश मोरे, राणी सिद्धेश्वर घाडगे तसेच अनवली येथील सिंधू आबासाहेब घोडके आणि लक्ष्मी तानाजी घोडके यांना प्रत्येकी सात लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

    तसेच, आंबे येथे दि. २९ जून २०२६ रोजी विजेच्या धक्क्याने लक्ष्मण नागणे व अलका नागणे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारस वैभव नागणे यांनाही शासनाच्या वतीने प्रत्येकी तीन लाख असे एकूण सहा लाख रुपये आणि शिवसेनेच्या वतीने दोन लाख रुपये, अशी एकूण आठ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

    यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करून त्यांना धीर दिला. दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने ही मदत सुपूर्द करण्यात आली.यावेळी आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तमराव जानकर, नगराध्यक्षा प्रणिती भालके, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.

    ००००

    - Advertisement -