
- शोकाकुल वातावरणात रामी गावाने दिली अखेरची मानवंदना
धुळे, दि. २१ (जिमाका वृत्त) : देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या धुळे तालुक्यातील रामी गावचे सुपुत्र, भारतीय सैन्यदलाचे जवान जयेश माळी यांना आज त्यांच्या जन्मभूमीत साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. अवघ्या २५ व्या वर्षी देशसेवेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या या वीरपुत्रावर शनिवारी सकाळी रामी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देताना संपूर्ण गाव शोकमग्न झाले होते. सैन्यदलाच्या वतीने वीरजवानाला मानवंदना अर्पण करण्यात आली.
मणिपूरमध्ये कर्तव्य बजावत असताना १८ नोव्हेंबर २०२६ रोजी लष्करी वाहनाच्या अपघातात वीरमरण आलेल्या जयेश माळी यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या मूळगावी रामी येथे आणण्यात आले. देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या या तरुण जवानाचे पार्थिव गावात दाखल होताच वातावरण शोकाकुल झाले. आपल्या गावचा सुपुत्र आता पुन्हा कधीही परतणार नाही, या जाणिवेने उपस्थितांचे डोळे पाणावले. वीरजवानाच्या अंतिम दर्शनासाठी ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते.
भारतीय सैन्यदलातील ३५७ फील्ड हॉस्पिटलमध्ये शिपाई (नर्सिंग असिस्टंट) म्हणून कार्यरत असलेले जयेश माळी यांनी २ वर्षे ६ महिने सैन्यसेवा बजावली होती. मणिपूरमधील उखरूल पूर्व भागातील चालाऊ (Chalau) येथे कर्तव्यावर असताना १८ नोव्हेंबर रोजी झालेल्या लष्करी वाहनाच्या अपघातात त्यांना वीरमरण आले. ऐन तारुण्यात देशसेवेची वाट निवडलेल्या जयेश यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मान्यवरांकडून वीरजवानाला श्रद्धांजली
वीरजवान जयेश माळी यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी महाराष्ट्र बटालियनचे कर्नल संजय कुमार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर डॉ. निलेश प्रकाश पाटील, आमदार राघवेंद्र भदाणे, माजी आमदार कुणाल पाटील, शरद पाटील, नवी मुंबई बाजार समितीचे संचालक रावसाहेब गिरासे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष देवरे, माजी अध्यक्षा धरती देवरे, तहसीलदार अरुण शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी तुषार देवरे, गटविकास अधिकारी नितीन खंडेराय, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण बोरसे, रामीचे माजी सरपंच दिलीप गिरासे यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वीरजवान जयेश माळी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
एका वीरपुत्राच्या आठवणी गावाच्या मनात कायम
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी देशसेवेच्या कर्तव्यावर असताना जयेश माळी यांची जीवनयात्रा थांबली. ज्या मातीत त्यांचे बालपण गेले, त्याच मातीत आज त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. कुटुंबीयांसाठी हा कधीही भरून न निघणारा आघात असला, तरी देशसेवेसाठी त्यांनी दिलेले योगदान रामी गावासाठी कायम अभिमानाचा विषय राहील. एका आई-वडिलांनी आपला तरुण मुलगा गमावला, तर रामी गावाने आपला कर्तव्यनिष्ठ वीरपुत्र गमावला. त्यांच्या स्मृती आणि देशसेवेप्रती असलेली निष्ठा सदैव स्मरणात राहील.
वीरजवान जयेश माळी यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही– पालकमंत्री जयकुमार रावल
धुळे तालुक्यातील रामी गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यदलातील वीरजवान जयेश माळी यांना मणिपूर येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात वीरमरण आले. ही घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. अवघ्या २५ वर्षांच्या वयात मातृभूमीच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान धुळे जिल्हा, महाराष्ट्र आणि संपूर्ण देश सदैव स्मरणात ठेवेल, अशा शब्दांत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी ऑडिओ शोकसंदेशाद्वारे वीरजवान जयेश माळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
एका तरुण, देशभक्त आणि कर्तव्यनिष्ठ जवानाच्या अकाली जाण्याने माळी कुटुंबावर, विशेषतः त्यांच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या मुलावर आई-वडिलांच्या असंख्य आशा होत्या, तोच मुलगा अचानक आपल्यातून निघून जाण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. या दुःखाच्या प्रसंगी माळी कुटुंब एकटे नाही. संपूर्ण रामी गाव, धुळे जिल्हा, महाराष्ट्र आणि देश त्यांच्या दुःखात सहभागी आहे, अशी भावना पालकमंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केली.
जयेश माळी यांनी अत्यंत कमी वयात देशसेवेचा मार्ग निवडून भारतमातेचे रक्षण करण्याचा निर्धार केला होता. त्यांचा त्याग, समर्पण आणि देशभक्ती आपल्या सर्वांसाठी, विशेषतः तरुण पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहील. त्यांचे छायाचित्र पाहिल्यानंतर त्यांचे तरुण, उत्साही आणि ऊर्जावान व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभे राहते. अशा उमद्या तरुणाच्या जाण्याने मन सुन्न होते. त्यांच्या आई-वडिलांचे सांत्वन करण्यासाठी आज शब्दही अपुरे पडतात, असेही पालकमंत्री श्री. रावल यांनी नमूद केले.
ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे असह्य दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. वीरजवान जयेश माळी, तुमचे बलिदान देश कधीही विसरणार नाही. तुमची देशसेवा आणि तुमचे नाव सदैव स्मरणात राहील, अशा भावपूर्ण शब्दांत पालकमंत्री श्री. रावल यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
००००००

WhatsApp