भारताच्या संकल्पपूर्तीसाठी आणि सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि.२१: शांतता, सहकार्य आणि मानवतेची मूल्ये अधिक बळकट करणे गरजेचे आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी तसेच सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    गेट वे ऑफ इंडिया 26/11 पीस कॉन्सर्ट : ग्लोबल पीस ऑनर्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर, मंत्री पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, भारतरत्न सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, करण जोहर, अक्षय कुमार, बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, उद्योगपती अनंत अंबानी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

      

    प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा आहे. शांतता व सुव्यवस्था राखणे ही शासनाची जबाबदारी असली, तरी समाजातील प्रत्येक घटकाची साथ आणि सहभाग लाभल्यास शांततेचे रूपांतर लोकचळवळीत होऊ शकते, असे  मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिव्यज फाउंडेशनने शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि समाजकल्याण या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. गरजूंच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी फाउंडेशनकडून करण्यात येत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. निःस्वार्थ भावनेने समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणारा हा उपक्रम शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. अशा पुरस्कारांमुळे समाजातील सेवाकार्यासाठी प्रेरणा मिळते. पुरस्कारप्राप्त सर्व मान्यवरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन केले.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कायद्याचा धाक किंवा युद्धाच्या माध्यमातून  शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही; शांततेसाठी  सकारात्मक संवाद आणि परस्पर विश्वास आवश्यक आहे. ‘ग्लोबल पीस ऑनर्स’च्या माध्यमातून हाच विचार पुढे नेला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम झाली असून, दहशतवाद आणि नक्षलवादाविरोधातील लढ्याला निर्णायक दिशा मिळाली आहे. सीमेवर लढणारे शूर जवान आणि अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस व सुरक्षा यंत्रणांमुळे देशाच्या सुरक्षेशी कोणीही खेळू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की,  शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांसोबतच समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. ‘ग्लोबल पीस ऑनर्स’सारखे उपक्रम समाजात एकोपा, बंधुभाव आणि सामंजस्याची भावना रुजविण्यासोबतच शांतता व सुरक्षिततेचा संदेश देतात. शहर शांत आणि सुरक्षित असेल, तर समाज आणि प्रत्येक कुटुंबात सुख-समाधान नांदेल, असे सांगून त्यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले.

    अमृता फडणवीस म्हणाल्या की, जग पूर्वीपेक्षा आता अधिक जोडले आहे पण एकमेकांची मनापासून काळजी घेणे शांतता जपणे महत्वाचे आहे. शांतता म्हणजे मानवतेची उपस्थिती आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देताना पोलीस, कमांडो, अग्निशमन दलाचे जवान, डॉक्टर, परिचारिका आणि सामान्य नागरिकांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी दाखविलेल्या धैर्याला त्यांनी अभिवादन केले. या हल्ल्यातील पीडित कुटुंबांचे दुःख आपण विसरलेलो नाही, असे सांगत द्वेष आणि हिंसाचाराला थारा नसलेला समाज घडविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. करुणा, सहानुभूती आणि मानवतेच्या मूल्यांतूनच शांततापूर्ण भविष्याची निर्मिती होऊ शकते. शांतता हे दूरचे स्वप्न नसून प्रत्येकाने जाणीवपूर्वक केलेली निवड आहे, असेही त्यांनी नमूद केले.

    दिविजा फडणवीस यांनी कार्यक्रमाचे  प्रास्ताविक  करताना सांगितले की, शांतता, बंधुता, त्याग आणि स्मरण यांचे प्रतीक असलेल्या ग्लोबल पीस ऑनर्समध्ये ज्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्तव्यासाठी शौर्य गाजवले.अशा वीरांचा सन्मान करण्यात येतो.

    १८ वर्षांपूर्वीच्या २६/११ च्या रात्री आपण अंधारापेक्षा प्रकाशाची आपण आठवण ठेवतो. सहायक उपनिरीक्षक

    शहीद तुकाराम ओंबळे, मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि पुढे येऊन लढलेल्या प्रत्येक पोलीस अधिकारी, कमांडो व सैनिकाची. त्या रात्री मुंबई आणि भारत एकजुटीने उभे राहिले हेच दिसून आले.

    या कार्यक्रमात शांती, मानवता, सामाजिक कार्य आणि देशसेवेसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता टायगर श्रॉफ यांनी सादर केलेल्या श्रीगणेश वंदनेने झाली.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांची मुलाखतकाराच्या भूमिकेतून मुलाखत घेतली. यावेळी जीवन जगण्याचा मार्ग दाखविणारे सद्गुरू यांचे विचार ईशा फाउंडेशनच्या माध्यमातून ४० भाषांमध्ये पोहोचविण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला.अभिनेता रणवीर सिंग यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची मुलाखत घेतली.यावेळी अभिनेता शाहरुख खान यांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांचा व्हिडिओ संदेशही दाखविण्यात आला.

    अमृता फडणवीस यांनी ‘ये मेरे वतन के लोगो’ आणि ‘ऐ वतन, मेरे आबाद रहे तू’ ही देशभक्तिपर गीते सादर केली. अभिनेता अक्षय कुमार यांनी ‘तेरी मिट्टी में मिल जावा’ आणि ‘सुनो गौर से दुनिया वालो’ या गीतांवर नृत्य सादर केले, तर गायक सुखविंदर सिंग यांनी ‘मेरे देश की धरती सोना उगले’, ‘चक दे इंडिया’ आणि कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ‘जय हो’ हे गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

    ‘ग्लोबल पीस ऑनर्स‘ पुरस्काराने सन्मान

    उद्योगपती  बालसुब्रमण्यन प्रभाकरन, आध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि २६/११ दहशतवादी हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शी देविका रोटावन यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  बालसुब्रमण्यन प्रभाकरन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सद्गुरू जग्गी वासुदेव यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सुनील शेट्टी, सज्जन जिंदाल आणि संगीता जिंदाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सचिन तेंडुलकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती अनंत अंबानी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या माध्यमातून ते करीत असलेल्या सामाजिक व मदतकार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. २६/११ च्या हल्ल्यावेळी अवघ्या नऊ वर्षांच्या असलेल्या आणि मुंबईतील सीएसटी स्थानकावर वडील व भावासोबत उपस्थित असलेल्या देविका रोटावन यांना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे आणि अभिनेता शाहरुख खान यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

    0000

    - Advertisement -