शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे कार्य समर्पित भावनेने करावे – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    - Advertisement -

    • गुणवत्तापूर्ण शिक्षण, आनंददायी शिक्षण; हाच शिक्षण विभागाचा ध्यास!
    • पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या शिक्षकांचा सत्कार

    मालेगाव, दि. २४ नोव्हेंबर (उमाका वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षकांनी अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे कार्य समर्पित भावनेने करावे. गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देतानाच शिक्षणातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणे, हा शिक्षण विभागाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.मालेगाव येथील एकात्मता जॉगिंग ट्रॅकवर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थिनींना ५०० सायकलींचे वितरण आज सकाळी करण्यात आले. तसेच पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सरोज जगताप, शिक्षणाधिकारी नरेश पाटील,  सुरेश निकम, तुषार शेवाळे, नीलेश कचवे आदींसह शिक्षणसेवक, विद्यार्थी, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


    मंत्री भुसे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राज्यभरातील विद्यार्थिनींना २५ हजार सायकली आणि महिलांना २५ हजार शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मालेगावसाठी ५०० सायकल आणि ५०० शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापूर्वीही सामाजिक दायित्व निधीतून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी एक हजार सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी सायकल वितरणाचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.ग्रामीण शाळांमध्ये सायकल बँकेची संकल्पना राबविण्यात येत आहे. आठवीपर्यंत एका शाळेत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थिनी दुसऱ्या शाळेत जात असल्यास, तिला दिलेली सायकल पहिल्या शाळेत परत जमा करावी. त्यानंतर ती सायकल अन्य गरजू विद्यार्थिनीला वापरासाठी देता येईल. मात्र, पुढील शाळा दोन ते पाच किलोमीटर अंतरावर असल्यास संबंधित विद्यार्थिनीला शिक्षणासाठी सायकलचा वापर सुरू ठेवता येईल. अशा पद्धतीने उपलब्ध साधनांचा अधिकाधिक विद्यार्थिनींना लाभ मिळवून देत मुलींचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातील. विद्यार्थिनींनी सायकल चालविताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी तसेच सायकलींची योग्य देखभाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

    पवित्र पोर्टलद्वारे पारदर्शक शिक्षक भरती
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक भरती प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुमारे ३० हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू असून, त्यापैकी आतापर्यंत ८ हजार ४३५ शिक्षक प्रत्यक्ष सेवेत रुजू झाले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये १६२ शिक्षकांची नियुक्ती झाली असून, मालेगाव तालुक्यात ५८ पेक्षा अधिक शिक्षकांची निवड झाली आहे. गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांना संधी मिळावी आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, या उद्देशाने शासनाने पवित्र पोर्टलची प्रक्रिया राबविली असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

    ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण, आनंददायी शिक्षण, शिक्षण भाकरीचे, शिक्षण राष्ट्रीयत्वाचे’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे आवश्यक आहे. खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच अनुदानित मराठी शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेतील अंतर कमी करण्यासाठी सरकारी शाळांचा दर्जा उंचावण्यावर भर देण्यात येत आहे. शिक्षण केवळ पदवी मिळविण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना रोजगारक्षम, स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक बनविणारे असावे. विद्यार्थ्यांमधील कला आणि क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठीही विभाग प्रयत्नशील आहे. क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्त करण्याच्या दृष्टीनेही सकारात्मक विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

    मालेगावच्या शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ
    मालेगाव शहर आणि ग्रामीण भागात आदर्श अंगणवाड्या विकसित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. खुल्या जागांमध्ये मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत आरओ जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचे नियोजन असून, येत्या आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. शाळांमध्ये स्वच्छतागृहे, स्वच्छ परिसर, इमारतींची दुरुस्ती व रंगरंगोटी तसेच उपलब्ध जागेनुसार खेळाची मैदाने विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

    राज्यातील सुमारे २७५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने मदतीचे निर्णय घेतले आहेत. शेतकरी कुटुंबांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्यात आली आहे. पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. मालेगाव तालुक्यातील  झोडगे, चंदनपुरी आणि दाभाडी येथील स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची कामे सुमारे ९९ टक्के पूर्ण झाली असून येत्या पंधरा दिवसांत या योजनांचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे. या योजनांमुळे संबंधित गावांची पाण्याची गरज पुढील १० ते २० वर्षांपर्यंत पूर्ण होण्यास मदत होणार आहे. पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न लक्षात घेऊन ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आवश्यक नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील युवक-युवतींच्या विवाहासाठी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अशा विवाह सोहळ्यांमुळे गरजू कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल. यासाठी संबंधित संस्थांच्या माध्यमातून इच्छुक वधू-वरांची नोंदणी करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले.

    शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य
    शिक्षकांना अधिकाधिक वेळ विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी उपलब्ध व्हावा, यासाठी अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या प्रलंबित अडचणी प्राधान्याने सोडविण्यासह शिक्षण विभागातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यावर भर दिला जाईल. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, पारदर्शकता आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन रुजविण्यासाठी शासन कटिबद्ध असून, शाळांमधील पायाभूत सुविधा बळकट करणे, शिक्षकांच्या अडचणी सोडविणे आणि विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, या माध्यमातून शिक्षणाचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

    यावेळी पवित्र पोर्टलद्वारे मूळ मालेगाव तालुक्यातील तसेच इतर जिल्ह्यातून मालेगाव येथे नियुक्त झालेले नवनियुक्त शिक्षक राजेंद्र दुकळे, धर्मराज जाधव, मंगेशकुमार साळुंखे, गीतांजली कचवे, नमिता गाणार यांनी मनोगत व्यक्त केले.
    00000

    - Advertisement -