मराठी साहित्याला वैचारिक समृद्धी देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकाचा यथोचित गौरव – मंत्री डॉ. उदय सामंत – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २४ : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि समीक्षक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची पुणे येथे होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही समस्त मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या निवडीमुळे मराठी साहित्याच्या वैचारिक परंपरेचा, सामाजिक बांधिलकीचा आणि समतेच्या विचारांचा गौरव झाला आहे, अशी भावना मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली.

    डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या साहित्यांमधून उपेक्षित समाजाचे वास्तव प्रभावीपणे मांडले आहे. ‘अक्करमाशी’ या आत्मकथनातून त्यांनी सामाजिक विषमता आणि संघर्षाचे वास्तव मांडत मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या ग्रंथातून त्यांनी दलित साहित्याच्या वैचारिक आणि समीक्षात्मक मांडणीला नवी दिशा दिली. तसेच ‘सनातन’ या कादंबरीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान प्राप्त झाला आहे.

    मराठी साहित्याला सामाजिक जाणिवांची आणि परिवर्तनशील विचारांची समृद्ध परंपरा लाभली आहे. डॉ. लिंबाळे यांच्या साहित्याने या परंपरेत मोलाची भर घातली आहे. १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने या ऐतिहासिक संमेलनाला निश्चितच वैचारिक उंची प्राप्त होईल, असा विश्वासही मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत यांनी व्यक्त केला.

    डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या अध्यक्षतेखाली होणारे शतक महोत्सवी साहित्य संमेलन मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या वाटचालीतील एक संस्मरणीय पर्व ठरेल, अशा शुभेच्छाही मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.

    ०००

    गजानन पाटील/विसंअ/

     

    - Advertisement -