खासदार डॉ. रामराव वडकुते यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार – महासंवाद

    - Advertisement -

    राज्यभरातील मान्यवरांची उपस्थिती; साश्रूनयनांनी दिला अखेरचा निरोप

    हिंगोली, दि. 24 (जिमाका) : हिंगोलीचे राज्यसभा खासदार डॉ. रामराव वडकुते यांच्या पार्थिवावर आज हिंगोली येथील महाकाली नगर परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याच्या विधिमंडळातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह मंत्री, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजबांधव, नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साश्रूनयनांनी सर्व उपस्थितांनी डॉ. वडकुते यांना अखेरचा निरोप दिला. पोलिस दलाच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.

    हिंगोली शहरातील महाकाली नगर परिसरात डॉ. वडकुते यांच्या अंत्यविधीस विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील,  महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार प्रज्ञा सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, हदगावचे आमदार बाबूराव पाटील कोहळीकर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी डॉ. वडकुते यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, डॉ. वडकुते यांनी अत्यंत संघर्षमय परिस्थितीतून पुढे येत गोरगरीब, उपेक्षित आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. सर्वसामान्य माणसाला विकासाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी अहोरात्र समाजसेवा केली. त्यांच्या निधनाने वडकुते कुटुंबीयांसह सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना मिळावे आणि दिवंगत डॉ. वडकुते यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.

    महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही डॉ. वडकुते यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, गेल्या 22 वर्षांच्या सहवासात त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. अनेक पदे भूषवूनही त्यांनी कधीही पदाचा अभिमान बाळगला नाही. ते स्वतःसाठी नव्हे, तर लोकसेवेसाठी जगले. वाड्या-पाड्यांवरील गरीब आणि समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी वाड्या-पाड्यांसह धनगरवाड्यांच्या विकासाचे अनेक संकल्प केले होते. त्यांचे अपूर्ण कार्य आणि स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी आता समाजातील प्रत्येक घटकाची आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे सामाजिक व राजकीय नुकसान झाले असे म्हणत महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. वडकुते यांना श्रद्धांजली अर्पण केली.

    पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, अत्यंत ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या डॉ. वडकुते यांनी आपल्या 72 वर्षांच्या आयुष्यातील सुमारे 40 वर्षे समाजसेवेसाठी खर्ची घातली. माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला, याला अधिक महत्त्व असते. सामाजिक कार्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करून डॉ. वडकुते यांनी याचा आदर्श घालून दिला. त्यांच्या निधनाने संपूर्ण हिंगोली जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, वडकुते यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

    कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही डॉ. वडकुते यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच वडकुते कुटुंबीयांना धीर देत श्रद्धांजली अर्पण केली. आमदार हेमंत पाटील, आमदार प्रज्ञा सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर आणि आमदार राजू नवघरे यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या.

    डॉ. वडकुते (वय 72) यांचे दि. 22 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव दि. 23 नोव्हेंबर रोजी रात्री परभणी येथून हिंगोलीतील नाईक नगर येथील निवासस्थानी आणण्यात आले. पोलिस दलाने त्यांच्या निवासस्थानी आज (ता. 24) रोजी पार्थिवास मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी पुष्पचक्र  अर्पण करून डॉ. वडकुते यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर अंत्ययात्रेस प्रारंभ झाला.

    हिंगोली शहरातील नाईक नगर येथील निवासस्थानापासून अग्रसेन चौक, इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, जवाहर रोड, पोस्ट ऑफिस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रिसाला बाजार आणि अकोला बायपास मार्गे अंत्ययात्रा महाकाली नगर येथे पोहोचली. येथे शासकीय इतमामात डॉ. वडकुते यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलाने हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत खासदार डॉ. वडकुते यांना श्रद्धांजली अर्पण केली.

    तत्पूर्वी माजी मंत्री महादेव जानकर, राजेश टोपे, गणेश हाके, शशिकांत तरंगे, बाळासाहेब किसवे, दीपक बोऱ्हाडे, गजानन घुगे, प्रा. लक्ष्मणराव हाके, भूषणसिंह महाराज होळकर, प्रकाशअण्णा शेंडगे, डॉ.विकास महात्मे, बाळासाहेब दोडकल्ले, डॉ. वडकुते यांचे जावई श्री.मदने आदींनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या.

    अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत  भुजबळ आदी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी डॉ. वडकुते यांचे अंत्यदर्शन घेत साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला व श्रद्धांजली वाहिली.

    00000

    - Advertisement -