
छत्रपती संभाजीनगर, दि.२६ (विमाका) : मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची बलस्थाने आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन जलसंवर्धन, पर्यटन तसेच पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्रभावी नियोजन करावे. ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र २०४७‘ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी विकसित मराठवाडा घडविणे आवश्यक असून, त्यासाठी विविध योजनांची प्रत्यक्ष पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले.
महास्ट्राईड (Maharashtra Strengthening Institutional Capabilities in Districts for Enabling Growth – MahaSTRIDE) प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटी कार्यालय येथे विभागस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महास्ट्राईडचे प्रकल्प संचालक अमन मित्तल, जागतिक बँकेच्या टास्क टीम लीडर नेहा गुप्ता, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) संस्थेचे अधिकारी, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचे जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा धोरणात्मक युनिट पथकांचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जिल्ह्यांना केंद्रस्थानी ठेवून आर्थिक विकासाला गती देणे आणि सार्वजनिक सेवांचे वितरण अधिक प्रभावी करणे, हा महास्ट्राईड प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी संस्थात्मक यंत्रणा, माहिती व्यवस्थापन, समन्वय आणि संनियंत्रण प्रणाली अधिक सक्षम करण्यासह डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राज्यस्तरीय नियोजन यंत्रणा बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे.
मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची बलस्थाने आणि स्थानिक गरजांचा सखोल अभ्यास करून मित्र संस्थेच्या सहकार्याने विकासाचे योग्य नियोजन करावे. विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलसंवर्धन आणि पाणीपुरवठ्याच्या दीर्घकालीन उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. पर्यटन विकासासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासह नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित पायाभूत सुविधांचा विकास करावा. नियोजन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. मात्र, योजनांची प्रभावी अंमलबजावणी उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातूनच करावी लागणार आहे. त्यामुळे योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. यामध्ये जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.
बैठकीत सन २०२६-२७ मधील जिल्हा प्रोत्साहन निधीच्या निकषांनुसार जिल्ह्यांची तयारी आणि जिल्हानिहाय पायाभूत माहिती सादर करण्याबाबत आढावा घेण्यात आला. तसेच वार्षिक कृती आराखडा २०२६-२७ आणि जिल्हा धोरणात्मक आराखडा यांच्या अंमलबजावणीची स्थिती, जिल्हानिहाय प्रगती, येणाऱ्या अडचणी तसेच जिल्हा धोरणात्मक युनिटकडून मिळणाऱ्या सहाय्याचा आढावा घेण्यात आला. डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनायझेशनची जिल्ह्यांतील सद्यस्थिती आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सहाय्याबाबतही चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यांच्या गरजांनुसार विकासाचे प्राधान्यक्रम निश्चित करून योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी विकसित मराठवाडा घडविण्याच्या दिशेने महास्ट्राईड प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय नियोजन आणि योजनांची अंमलबजावणी अधिक सक्षम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
यावेळी महास्ट्राईडचे प्रकल्प संचालक अमन मित्तल आणि जागतिक बँकेच्या टास्क टीम लीडर नेहा गुप्ता यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड या आठही जिल्ह्यांतील जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांसमवेत प्रस्तावित एकात्मिक जिल्हा डेटा पोर्टल विकसित करण्याबाबत चर्चा केली. यासाठी जिल्ह्यांतील सध्याच्या माहिती प्रणाली, अहवाल, माहितीतील त्रुटी, जिल्हा निर्देशांक, माहितीचे स्रोत आणि भौगोलिक माहिती प्रणाली विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच विकासकामांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
oooo

WhatsApp