
• मुंबई पुस्तक महोत्सवात ‘भेटा तुमच्या सुपरहिरोला’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद; अंतराळ प्रवासातील रोमांचकारी अनुभवांची दिली माहिती
मुंबई, दि. २६ : जिद्द, कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्यपूर्ण तयारीच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते. त्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही प्रयत्न सुरू ठेवण्याची तयारी हवी. आकाश ही मर्यादा नसून नव्या संधींचे प्रवेशद्वार आहे, असा प्रेरणादायी संदेश भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आज येथे विद्यार्थ्यांना दिला.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवात ‘भेटा तुमच्या सुपरहिरोला’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंतराळ प्रवासाविषयी आणि अंतराळ संशोधनाविषयी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली. नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक कॅप्टन युवराज मलिक यांनी त्यांच्याशी संवाद साधला.अंतराळ प्रवासातील अनुभव सांगताना शुभांशू शुक्ला यांनी प्रक्षेपणापासून ते पृथ्वीवर पुनरागमनापर्यंतच्या विविध टप्प्यांची माहिती दिली. अवघ्या साडेआठ मिनिटांत रॉकेट पृथ्वीपासून सुमारे २०० किलोमीटर उंचीवर पोहोचते आणि ताशी सुमारे २८ हजार ५०० किलोमीटर वेग प्राप्त करते. या प्रवासादरम्यान अंतराळवीरांच्या शरीरावर प्रचंड दाब निर्माण होतो. त्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि शारीरिक क्षमता आवश्यक असते, असे त्यांनी सांगितले.अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणातील अनुभव विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरला. या वातावरणात शरीर तरंगत असल्याने हालचालींची पद्धत पूर्णपणे बदलते. पृथ्वीवर सहज करता येणाऱ्या हालचाली अंतराळात वेगळ्या पद्धतीने कराव्या लागतात. अंतराळात शरीरात होणारे बदल, रक्ताभिसरणातील बदल, उंचीत होणारी तात्पुरती वाढ तसेच पृथ्वीवर परतल्यानंतर शरीराला पुन्हा गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न याविषयीही त्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली.
अंतराळातून पृथ्वीकडे पाहण्याचा अनुभव हा आपल्या संपूर्ण प्रवासातील सर्वाधिक भावनिक आणि अविस्मरणीय क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. अंतराळातून पृथ्वीवर पाहताना देश, प्रदेश किंवा शहरांच्या सीमा वेगळ्या दिसत नाहीत, तर संपूर्ण पृथ्वी हेच आपले घर असल्याची भावना मनात निर्माण होते. हा अनुभव मानवतेच्या एकतेची जाणीव करून देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील वैज्ञानिक प्रयोगांविषयी माहिती देताना त्यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे अग्नीचे वर्तन, द्रवपदार्थांची हालचाल आणि विविध भौतिक प्रक्रियांमध्ये होणारे बदल स्पष्ट केले. अंतराळातील संशोधनातून भविष्यात विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरणारे नवे निष्कर्ष मिळण्याची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विशेषतः तयारी आणि सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. परीक्षेच्या वेळी किंवा आव्हानात्मक प्रसंगात यश मिळविण्यासाठी त्या क्षणापूर्वी केलेली तयारी महत्त्वाची ठरते. त्यामुळे रोजच्या अभ्यासात, व्यायामात आणि कौशल्यविकासात सातत्य राखले पाहिजे. प्रत्येक वेळी भविष्याची चिंता करण्याऐवजी ‘मी आत्ता काय करू शकतो?’ या प्रश्नावर लक्ष केंद्रित करा. सध्याच्या क्षणातील योग्य कृतीच तुम्हाला ध्येयाच्या जवळ घेऊन जाईल, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
‘अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीतही सहजतेने काम करण्याची क्षमता विकसित करा’, हा अंतराळ प्रवासातून मिळालेला महत्त्वाचा धडा असल्याचे त्यांनी सांगितले. अभ्यास, व्यायाम, सकस आहार आणि शिस्त या गोष्टी सुरुवातीला कठीण वाटल्या तरी त्यातून मिळणारे परिणाम दूरगामी असतात. यशासाठी मेहनतीला पर्याय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या भविष्यातील वाटचालीविषयी बोलताना त्यांनी गगनयान मोहीम, भारतीय अंतराळ स्थानकाची संकल्पना आणि २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीराला चंद्रावर पाठविण्याच्या ध्येयाचा उल्लेख केला. अंतराळ क्षेत्रात आता खासगी उद्योग, संशोधन संस्था, अभियंते, शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांसाठीही मोठ्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अंतराळ क्षेत्रातील संधींचे स्वरूप अधिक व्यापक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अंतराळवीर होण्यासाठी आवश्यक पात्रता, प्रशिक्षण, अंतराळातील दैनंदिन जीवन, व्हॉयेजर मोहिमेचे महत्त्व आणि अंतराळातील गुरुत्वाकर्षण अशा विविध विषयांवर प्रश्न विचारले. व्हॉयेजर मोहिमेचा उल्लेख करताना विज्ञान, अभियांत्रिकी आणि संशोधकांच्या एकत्रित प्रयत्नांतून अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात, असे त्यांनी सांगितले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड जिज्ञासा आणि ज्ञानाची ओढ असून त्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे आहे, असे निरीक्षण त्यांनी मांडले. “आकाश ही कधीच मर्यादा नव्हती. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही आणि भारतासाठीही नाही,” या संदेशाने त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
मुंबई पुस्तक महोत्सवातील हा संवाद विद्यार्थ्यांसाठी केवळ अंतराळ प्रवासाची माहिती देणारा नव्हे, तर विज्ञानाची जिज्ञासा, संशोधनाची प्रेरणा आणि स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक असलेल्या जिद्दीची जाणीव करून देणारा ठरला.
000

WhatsApp