
मुंबई, दि. २६ : राज्यातील महिला उद्योजकांना पर्यटन क्षेत्रात व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि पर्यटन क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महिला केंद्रित पर्यटन योजनेची अंमलबजावणी आज ‘महा डीबीटी २.०’ प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. सह्याद्री सभागृहात मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ‘महा डीबीटी २.०’ पोर्टलच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने पर्यटन विभागाच्या महिला केंद्रित पर्यटन योजनेचा या प्रणालीद्वारे गुरुवारी शुभारंभ करण्यात आला आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी, महिला उद्योजकांना पर्यटन व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सांगितले.
‘महा डीबीटी २.०’ प्रणालीच्या माध्यमातून योजनेचा लाभ पारदर्शक, सुलभ आणि गतिमान पद्धतीने थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार असून, अर्ज प्रक्रिया आणि लाभ वितरण अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. यामुळे महिला उद्योजकांना पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळेल. पर्यटन क्षेत्रात महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन रोजगारनिर्मिती, व्यवसायवृद्धी आणि राज्याच्या पर्यटन विकासाला गती देण्याच्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जून २०२३ पासून राज्यात ‘आम्ही महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन’ धोरणांतर्गत महिला पर्यटन उद्योजकांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविणे आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. महिला उद्योजकांचा विकास, महिलाकेंद्रित पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांची सुरक्षितता, महिला पर्यटकांसाठी विशेष पर्यटन उत्पादने व सुविधा तसेच पर्यटन विकासासाठी महिलांचा सहभाग वाढविणे यावर या धोरणात भर देण्यात आला आहे. या धोरणाची अंमलबजावणी पर्यटन विभागामार्फत करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत पर्यटन व्यवसाय उभारण्यासाठी मान्यताप्राप्त बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर शासनामार्फत सहाय्य देण्यात येते. पर्यटन व्यवसाय उभारण्यासाठी घेतलेल्या रु.१५ लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाची रक्कम ८५ टक्क्यांच्या मर्यादेत शासनामार्फत परत करण्यात येते. व्याज परताव्याची रक्कम दरमहा लाभार्थी महिलांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. कर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत, अथवा कमाल सात वर्षांपर्यंत किंवा व्याज परताव्याची रक्कम रु.४.५ लाख होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीपर्यंत हा लाभ देण्यात येतो. या योजनेमुळे महिला उद्योजकांना पर्यटन व्यवसाय उभारणी आणि विस्तारासाठी आर्थिक आधार मिळत आहे.
योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात लाभार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत होते. नोव्हेंबर २०२३ पासून पर्यटन संचालनालयामार्फत या योजनेसाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून, अर्ज प्रक्रिया, अर्जांची छाननी आणि लाभ वितरणाची कार्यवाही डिजिटल माध्यमातून करण्यात येत आहे. या पोर्टलच्या अधिक सुलभ आणि प्रभावी वापरासाठी ‘महा डीबीटी २.०’ प्रणालीमध्ये योजनेचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, सद्यस्थितीत स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलवर १०,३२२ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ८,०३८ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. बँकांकडून २,२६८ प्रकरणांमध्ये कर्ज मंजूर झाले असून, मंजूर कर्जाची एकूण रक्कम रु. २३४,४९ कोटी आहे. व्याज परताव्याचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या १,३४३ असून, वितरित व्याज परताव्याची एकूण रक्कम रु. ३.६९ कोटी इतकी आहे, या माध्यमातून राज्यातील महिलांकडून पर्यटन व्यवसाय क्षेत्रात उद्योजकतेसाठी पुढाकार घेतला जात असल्याचे दिसून येते.
पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज म्हणाल्या, महिला केंद्रित पर्यटन योजना महिलांना पर्यटन व्यवसायात प्रवेश करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. डिजिटल प्रणालीद्वारे योजनेची अंमलबजावणी केल्याने प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम होईल तसेच महिला उद्योजकांना योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल.
oooo
संध्या गरवारे/विसंअ

WhatsApp