
- संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन; शिवकालीन साहित्य व शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन
‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ विशेष सोहळा उत्साहात संपन्न
रायगड, दि. २६ – छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले गड-किल्ले हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आणि आपली अमूल्य संपत्ती आहे. या वारशाचे जतन, संवर्धन, स्वच्छता आणि पावित्र्य राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. गड-किल्ल्यांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी सुरू करण्यात आलेले अभियान केवळ शासकीय उपक्रम न राहता त्याचे व्यापक लोकचळवळीत रूपांतर व्हावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त हिरकणीवाडी येथे आयोजित ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष सोहळ्यात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.यावेळी पालकमंत्री भरत गोगावले, खासदार ज्योतीताई वाघमारे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, जिल्हा परिषदेचे सभापती चंद्रकांत कळंबे, विकास गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन काळाची गरज
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गड-किल्ले ही आपली ऐतिहासिक स्मृती, ऐश्वर्य आणि वारसा आहे. या वास्तूंचे जतन करताना त्यांचे पावित्र्य आणि मांगल्य राखणे आवश्यक आहे. गडांवर येणाऱ्या दुर्गप्रेमींना आवश्यक सुविधा मिळाल्या पाहिजेत. गड-किल्ले स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि प्लास्टिकमुक्त असावेत. तेथे पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, वृक्षारोपण आणि सौरदिव्यांची सुविधा असावी या भूमिकेतून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन अभियान सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचे अभिनंदन करताना त्यांनी गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्रातील ११ गड-किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सातासमुद्रापार पोहोचला आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची बाब आहे. गड-किल्ल्यांच्या माध्यमातून शिवरायांचा आदर्श जगापर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवरायांचा लोककल्याणकारी राज्यकारभार आणि संविधानाची मूल्ये
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श निर्माण केला. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. गडांवरील पाण्याची व्यवस्था, धान्याची कोठारे, बाजारपेठा आणि अष्टप्रधान मंडळाची व्यवस्था यांतून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. साडेचारशे वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या गड-किल्ल्यांचे स्थापत्य आणि अभियांत्रिकी आजही आश्चर्यचकित करणारे असल्याचे ते म्हणाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील शोषित, दलित, पीडित आणि वंचित घटकांना न्याय व समान संधी मिळवून देण्याची व्यवस्था निर्माण केली. संविधानामुळे सर्वसामान्य नागरिकालाही देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये जपणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे देशासाठी अत्यंत मोलाचे आहेत.
गड-किल्ल्यांवरील स्वच्छता, वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणावर भर
गड-किल्ल्यांवर प्लास्टिकचा वापर टाळणे, स्वच्छता राखणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, वृक्षारोपण करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विविध उपक्रम राबवत आहे. गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि पुनर्स्थापनेच्या कामांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
महापालिका आणि नगरपालिका नसलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा साचणारा प्लास्टिक कचरा आणि त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटे-छोटे क्लस्टर तयार करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिल्या आहेत. प्लास्टिक खाल्ल्यामुळे जनावरांचे होणारे नुकसान रोखणे तसेच नद्यांचे प्रदूषण थांबविण्यासाठीही उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी ईव्ही ट्रॅक्टर योजनेतून मदतीचा हात
शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याची संकल्पना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मांडली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ईव्ही ट्रॅक्टर योजनेच्या माध्यमातून येत्या २३ जानेवारीपासून योजना कार्यान्वित करण्यात येणार असून शेतकऱ्यांना कमी खर्चात ईव्ही ट्रॅक्टर उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पालकमंत्री भरत गोगावले यांनी ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या उपक्रमाचे कौतुक केले. गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याबरोबरच त्यांची स्वच्छता आणि संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी या उपक्रमासाठी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी विशेष कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासोबतच औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मिती यांचाही समतोल राखणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे संरक्षण महत्त्वाचे आहेच; मात्र उद्योग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
खासदार ज्योती वाघमारे यांचेही समयोचित भाषण झाले.
प्रास्ताविकात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २३ जानेवारीपासून राज्यातील युनेस्कोचा वारसा दर्जा प्राप्त ११ गड-किल्ल्यांवर शिवदूत आणि शिवप्रेमींच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि पर्यावरण संवर्धनाची मूल्ये तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यापुढे गड-किल्ल्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ग्रामपंचायतींच्या सहकार्याने घनकचरा व्यवस्थापन आणि सौरऊर्जेवर आधारित प्रकाशव्यवस्था निर्माण करण्याचे नियोजन आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी ईव्ही ट्रॅक्टर धोरणांतर्गत विशेष लाभ देण्याचाही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन; स्वच्छतादूतांशी संवाद
सर्वप्रथम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि पालकमंत्री भरत गोगावले यांनी किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन अभिवादन केले. तसेच यावेळी त्यांनी गड-किल्ल्यांच्या स्वच्छता व संवर्धनासाठी कार्यरत स्वच्छता दूतांशी संवाद साधला. १२ वर्षीय शर्वरी म्हात्रेचा सन्मान आतापर्यंत २०० पेक्षा अधिक गड-किल्ले सर करणाऱ्या १२ वर्षीय शर्वरी म्हात्रे या चिमुकलीशी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संवाद साधला. गड-किल्ल्यांची स्वच्छता, प्लास्टिकमुक्त परिसर आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबत तिने मांडलेल्या सूचनांचे त्यांनी कौतुक करत शर्वरीचा त्यांनी सन्मानही केला.
संविधान उद्देशिकेचे वाचन; गड-किल्ले संवर्धन अभियानाचे लोकार्पण
संविधान दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात संविधानातील उद्देशिकेचे शपथपूर्वक सामूहिक वाचन करण्यात आले. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन अभियानाचे’ लोकार्पण करण्यात आले. मुख्य कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या शिवकालीन साहित्य व शस्त्रास्त्र प्रदर्शनाचेही फीत कापून त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना मान्यवरांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.
0000

WhatsApp