नाशिक, दिनांक ११ जून, २०२६ (जिमाका वृत्तसेवा): पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ‘मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम’ राज्यभर सुरू केली आहे. पशुधनाचे आरोग्य अबाधित राखणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असून, निश्चित करण्यात आलेल्या लक्ष्यांकित उद्दिष्टांच्या शंभर टक्के पूर्तीसाठी विभागामार्फत व्यापक आणि काटेकोर नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.
पावसाळ्याच्या काळात पशुधनामध्ये घटसर्प व फऱ्या यांसारख्या संसर्गजन्य आणि घातक आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी मान्सूनपूर्व लसीकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. लसीचा परिणामकारकपणा कायम राखण्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला असून, राज्यस्तरापासून ग्रामीण भागातील उपकेंद्रांपर्यंत लसी सुरक्षित तापमानात पोहोचविण्यासाठी अद्ययावत कोल्ड बॉक्सचा वापर करण्यात येत आहे.
मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार लसींचा पुरेसा साठा आधीच वितरित करण्यात आला असून पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके गावागावांत आणि गोठ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून ‘डोअर स्टेप’ पद्धतीने लसीकरणाची सेवा देत आहेत. कोणतेही जनावर लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या मोहिमेचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे लसीकरणाचे डिजिटल आणि पारदर्शक व्यवस्थापन. प्रत्येक पशुधनाला लस दिल्यानंतर त्याची नोंद केंद्र शासनाच्या ‘भारत पशुधन प्रणाली’ (NDLM Portal) वर तात्काळ करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पशुधनाचे १२ अंकी ओळख बिल्ल्याद्वारे टॅगिंग करूनच नोंदणी केली जाणार असून, त्यामुळे मोहिमेच्या प्रगतीवर रिअल-टाइम देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. तसेच बनावट अथवा चुकीच्या नोंदींना आळा घालून लसीकरण मोहिमेची विश्वासार्हता आणि परिणामकारकता वाढण्यास मदत होणार आहे.
पावसाळ्यात जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता असते आणि संसर्गजन्य रोगांचा प्रसार वेगाने होऊ शकतो. त्यामुळे गाई, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्यांचे मान्सूनपूर्व लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. यासाठी पशुपालकांनी आपल्या जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पशुसंवर्धन आयुक्त डॉ.पाटील यांनी केले आहे.
000000




















WhatsApp