मुंबई, दि. १९ : योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन‘ म्हणून घोषित केल्यानंतर जगभरात या दिनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर रा. आ. पोदार आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय, वरळी येथील स्वस्थवृत्त व योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. वृषाली उजेडे यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत २२ ते २६ जून २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन निवेदिका सुचेता गरुडे यांनी केले आहे.
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वाकरिता योग अशी असून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य संवर्धनासाठी योगाचे योगदान अधोरेखित करण्यात येत आहे. नियमित योगाभ्यासामुळे तणाव नियंत्रण, रोगप्रतिकारक शक्ती वाढ, मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि जीवनशैलीजन्य आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. आधुनिक धकाधकीच्या जीवनात योगाचे वाढते महत्त्व, विविध योगप्रकार, दैनंदिन जीवनातील योगाचा उपयोग, योग व मानसिक आरोग्य यांचा संबंध; तसेच सर्व वयोगटांसाठी योगाचे फायदे याविषयी डॉ. उजेडे यांनी या मुलाखतीत सविस्तर माहिती दिली आहे.
00000
जयश्री कोल्हे/ससं




















WhatsApp