वसतिगृहाच्या चळवळीतून सामाजिक सुधारणा करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज

वसतिगृहाच्या चळवळीतून सामाजिक सुधारणा करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज
- Advertisement -


भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात अनेक महापुरुषांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ‘शिक्षण हेच मुक्तीचे शस्त्र’ मानले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मूलमंत्र दिला. जागतिक स्तरावरही अमेरिकेचे शिक्षणतज्ज्ञ जॉन ड्यूई, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रध्यक्ष नेल्सन मंडेला आणि इतर अनेक विचारवंतांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचा पाया मानले. मात्र शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करण्यासाठी केवळ शाळा उभारणे पुरेसे नसते; विद्यार्थ्यांना राहण्याची, जेवणाची, अभ्यासाची आणि सुरक्षित वातावरणाचीही गरज असते. ही गरज ओळखून वसतिगृहांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची व्यापक चळवळ उभारणारे भारतातील अग्रगण्य समाजसुधारक म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज.

२६ जून १८७४ रोजी जन्मलेल्या यशवंतराव घाटगे यांना पुढे कोल्हापूरच्या राजघराण्यात दत्तक घेण्यात आले. पुढे ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणून इतिहासात अजरामर झाले. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांनी करवीर संस्थानची राज्यसूत्रे स्वीकारली. ६ मे १९२२ ला त्यांचे निधन झाले. अवघ्या ४८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि प्रशासकीय क्षेत्रात इतके क्रांतिकारी कार्य केले की, त्यांना आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे शिल्पकार म्हणून गौरविले जाते.

बहुजन समाजाला अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी राजर्षी शाहूंनी अनेक चळवळी उभी केल्या त्यातील सर्वाधिक प्रभावी चळवळ ही वसतिगृहांची चळवळ ठरली आहे. राज्याच्या कोषातून, राजाच्या उपयोगाच्या, मंदिराच्या डागडुजीच्या पैशाला त्यांनी वसतीगृहासाठी वळते केले. काहींना वार्षिक मदत, काहींना इमारती, काहींना जमीनी देऊन स्वत: उभे राहून त्यांनी वसतिगृहे उभारली.

शाहू महाराजांच्या विचारांवर महात्मा ज्योतिराव फुले, यांच्या सत्यशोधक चळवळीचा मोठा प्रभाव होता. बहुजन समाजाचे उत्थान शिक्षणातूनच होऊ शकते, हा फुले यांचा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्ष प्रशासनात उतरविला. एका शतकानंतरही आजही त्यांच्या वसतिगृहांमधून अनेकांचे आयुष्य घडत असून त्यांनी सुरू केलेली ही चळवळ जवळपास 125 वर्षानंतरही अजूनही सक्षमपणे विद्यार्थी घडविण्याचे काम करीत आहे.कोल्हापुरात विविध ठिकाणी उभे असणारे हे वसतीगृह छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीची कल्पना देणारे ठरतात.

सुरुवातीला सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृहाचा प्रयोग करण्यात आला. राजाराम वसतिगृह हा त्याचा प्रारंभिक प्रयत्न मानला जातो. मात्र प्रत्यक्षात सामाजिक विषमता आणि जातीय पूर्वग्रहांमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अपेक्षित वातावरण मिळत नव्हते. काही ठिकाणी प्रवेशाचे धोरण सर्वांसाठी खुले असले तरी प्रत्यक्ष लाभ काही मोजक्या घटकांनाच मिळत असल्याचे शाहू महाराजांच्या निदर्शनास आले. या अनुभवातून त्यांनी स्वतंत्र समाजनिहाय वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला. जातीव्यवस्थेचा पगडा समाजावरून जात नसल्यामुळे शाहू महाराजांनी काढलेला हा उपाय बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभावी ठरला. या वसतिगृहांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी संबंधित समाजातील सुशिक्षित आणि विश्वासार्ह व्यक्तींवर सोपविण्यात आली. त्यामुळे समाजातील नेतृत्व विकसित झाले आणि शिक्षणाची चळवळ लोकचळवळ बनली. सामाजिक परंपरा, चातुर्वर्ण्याचा प्रभाव त्यामुळे पुढे त्यांनी बहुजन विद्यार्थ्यांना वेगळी वसतीगृहे काढून जातीच्या उतरंडीच्या जोखडातून मुक्त केले.

कोल्हापूर संस्थांमध्ये 1896-97 ला दुष्काळ पडला.  ग्रामीण भागातून मुले शिक्षणासाठी येणे बंद झाले. राहणे, खानावळ, कपडालत्ता सर्वच गरीबांना परवडणे शक्य नव्हते.  ही बाब शाहू महाराजांच्या लक्षात आली याशिवाय लंडन दौऱ्यामध्ये तेथील शिक्षण पद्धतीचा अभ्यास केल्यावर त्यांना वसतिगृह ही कल्पना नावीन्यपूर्ण व परिवर्तनाची वाटली. १९०१ पासून कोल्हापूरमध्ये वसतिगृह उभारणीची व्यापक चळवळ सुरू झाली. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, जैन बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, वीरशैव लिंगायत बोर्डिंग, नामदेव बोर्डिंग, दैवज्ञ बोर्डिंग, सारस्वत बोर्डिंग, कोष्टी, आर्य समाज गुरुकुल, वैश्य बोर्डिंग, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग, ढोर- चांभार समाजासाठी इंदुमती राणीसाहेब वसतीगृह, अनुसुचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी अर्थात अस्पृशांसाठी ‘मिस क्लार्क’ वसतिगृह उभारण्यात आली. संशोधनपर नोंदींनुसार शाहू महाराजांनी सुमारे २० ते २२ वसतिगृहांचे जाळे उभे केले होते.

शाहू महाराजांच्या वसतिगृह चळवळीतील सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९०८ मध्ये सुरू झालेले ‘मिस क्लार्क वसतिगृह’. हे वसतिगृह अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले होते. हजारो वर्षे ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या गेले. त्या अस्पृश्य समाजाला शिक्षणाची दारे सताड उघडणारा हा क्रांतिकारी निर्णय होता.  तत्कालिन व्यवस्थेत या निर्णयाची चर्चा देशभर झाली.  शाहू महाराजांची ही दूरदृष्टी आणि या निर्णयाची गरज काय होती हे त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात शिक्षणासाठी 1920 मध्ये त्यांनी केलेल्या मदतीतून स्पष्ट होते. राजर्षी शाहू महाराजांची मागासवर्गीयांबाबतची कणव यातून स्पष्ट होते. १९०८ मध्ये स्थापन झालेले मिस क्लार्क वसतिगृह हे भारतातील दलित विद्यार्थ्यांसाठीच्या सर्वात महत्त्वाच्या शैक्षणिक उपक्रमांपैकी एक होते. गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांच्या कन्या मिस व्हायोलेट क्लार्क यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी देणगी व जनजागृतीचे कार्य केले. त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून शाहू महाराजांनी त्यांच्या नावाने वसतिगृह सुरू केले. हे वसतिगृह दलित शिक्षणाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरले. शाहू महाराजांनी या वसतिगृहासाठी स्वतंत्र इमारत, खेळाचे मैदान आणि आर्थिक अनुदान उपलब्ध करून दिले.

वसतिगृह ही केवळ निवासाची व्यवस्था नव्हती. तेथे निवास, भोजन, अभ्यासासाठी जागा, शिष्यवृत्ती, ग्रंथालय, शिस्तबद्ध वातावरण आणि सामाजिक जाणीव यांची सांगड घालण्यात आली होती. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना शहरातील शिक्षणाशी जुळवून घेण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरले. आजही हे वसतीगृह सुरू असून या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांकडून सुंदर इमारत उभारली आहे.

मुस्लिम विद्यार्थ्यांसाठीही त्यांनी याच काळात वसतीगृह उभारले. हे वसतिगृह आजही सुरू असून सर्व समाजातील विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेतात. शाहू महाराजांनी ठरवून दिल्याप्रमाणे मुस्लिम ट्रस्टद्वारे हे वसतिगृह आजही कार्यरत असून विविध मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या वसतिगृहांची रचना कुठेच दिसून येत नाही.  विशेष म्हणजे शंभर वर्षानंतरही हे वसतिगृह अजूनही विद्यार्थ्यांना अल्पदरामध्ये राहण्याची, जेवणाची, निवाऱ्याची, व्यवस्था करून देते.अनेक पिढ्यांना घडविण्याचे काम या दगडी कोरीव इमारतीतून झाले असून कोल्हापूरचा फेरफटका मारल्यानंतर या वास्तू आजही लक्ष वेधून घेतात.

शाहू महाराजांनी शिक्षण आणि रोजगार यांचा परस्परसंबंध ओळखला होता. शिक्षण घेतलेल्या मागासवर्गीय युवकांना नोकरीची संधी मिळाली नाही तर त्यांचा शिक्षणावरील विश्वास कमी होईल, हे त्यांनी ओळखले. त्यामुळे २६ जुलै १९०२ रोजी त्यांनी संस्थानातील सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी ५० टक्के आरक्षण जाहीर केले. भारतातील आरक्षणाच्या इतिहासातील हा एक मैलाचा दगड मानला जातो. शिक्षण, वसतिगृहे आणि आरक्षण या त्रिसूत्रीमुळे बहुजन समाजात नवे नेतृत्व निर्माण झाले.

शाहू महाराजांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. १९१७ मध्ये त्यांनी मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा लागू केला. सात ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांना शाळेत पाठविणे पालकांसाठी बंधनकारक करण्यात आले. मुलांना शाळेत न पाठविणाऱ्या पालकांवर दंड आकारण्याची तरतूदही करण्यात आली होती. काही नोंदींनुसार विलंब करणाऱ्या पालकांकडून दरमहा एक रुपया दंड आकारला जात असे.स्वतःच्या दरबार खजिन्यातून आणि देवस्थान फंडातून पैसे वळते करून शिक्षणाला महत्त्व देणारा हा राजा म्हणूनच सामाजिक क्रांतीचा जनक मानला जातो.

या योजनेसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून शाहू महाराजांनी विशेष शिक्षण कर लागू केला. डॉक्टर, वकील, सावकार, अधिकारी आणि विशिष्ट उत्पन्न गटातील घटकांकडून शिक्षण उपकर आकारण्यात येत असे. शिक्षणासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याचा हा दूरदृष्टीचा निर्णय होता.

शाहू महाराजांच्या कार्यकाळात कोल्हापूरला ‘शिक्षणाची काशी’ म्हणून ओळख मिळाली. १९१७ मध्ये संस्थानात केवळ २७ शाळा आणि सुमारे १,३०० विद्यार्थी होते. मात्र १९२२ मध्ये त्यांच्या निधनाच्या वेळी शाळांची संख्या ४२० पर्यंत आणि विद्यार्थ्यांची संख्या २२ हजारांहून अधिक झाली होती. शिक्षणाचा हा विस्तार अभूतपूर्व मानला जातो.

शाहू महाराजांनी कोल्हापूरला ‘मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस’ असे संबोधले होते.  महाराष्ट्रभर उभारल्या गेलेल्या वसतिगृहांच्या चळवळीमागे त्यांचीच प्रेरणा होती. त्यांनी उभारलेल्या या वसतीगृहाचा लाभ, या वसतिगृहांमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या विविध क्षेत्रात नाव कमावणाऱ्या अनेकांनी घेतला आहे.

आज महाराष्ट्र शासन समाजकल्याण, इतर मागास बहुजन कल्याण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, भटक्या-विमुक्त कल्याण तसेच मराठा समाजासाठी उभारण्यात येणाऱ्या विविध वसतिगृहांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत आहे. या सर्व योजनांच्या पायाशी शाहू महाराजांनी मांडलेली ‘शिक्षण सर्वांसाठी’ हीच मूलभूत संकल्पना असल्याचे स्पष्ट दिसते. वसतिगृह केवळ विद्यार्थी घडवत नाही तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देते राज्य शासनाने वसतिगृहाचे महत्त्व लक्षात घेऊन विविध खात्यामार्फत हजारो वसतिगृहांची, आश्रमशाळांची उभारणी केली आहे.  या सुविधांमधून तयार झालेली एक पिढी राज्याचे विविध क्षेत्रात नेतृत्व करत आहेत.

राजर्षी शाहू महाराजांचे संपूर्ण कार्य पाहिले तर त्यांनी शिक्षणाला केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन मानले नाही, तर सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमानाचे माध्यम मानले. ब्रिटिश भारतामध्ये अन्य राज्यांमध्ये शिक्षणावर जितका खर्च होत नव्हता तितका खर्च कोल्हापूर सारख्या एका छोट्या संस्थांमध्ये महाराजांच्या दूरदृष्टीमुळे व शैक्षणिक महत्त्व त्यांना पटल्यामुळे होत होता. शैक्षणिक आघाड्यांवर महाराष्ट्रामध्ये पुढे मोठ मोठ्या संस्था उभ्या झाल्या, विद्यापीठे उघडल्या गेली, या सर्वांची प्रेरणा छत्रपती शाहू महाराज होते.
शाहू महाराजांनी उभी केलेली ही वसतिगृहे आजही ताठ मानेने सुरु आहेत.  आता जातीची बंधणे राहिली नाही.  सर्व वसतिगृहात सर्व जाती-पातीची मुले शिक्षण घेत आहेत.  मात्र गरजू , गरीब आणि प्रज्ञावान मुलांसाठी आजही ही वसतिगृहे सामाजिक, आर्थिक परिवर्तनाची व मानसिक बलस्थानाची केंद्रे  आहेत.

वसतिगृह चळवळीच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची दारे बहुजन समाजासाठी खुली केली. शिक्षण, आरक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृहे आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण या उपाययोजनांद्वारे त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा एक नवा अध्याय लिहिला. म्हणूनच शाहू महाराजांना शिक्षणातून समाज परिवर्तन घडविणारे युगपुरुष म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. समाजाच्या प्रगतीचा खरा मार्ग शिक्षणातूनच जातो.

प्रवीण टाके
उपसंचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

 



Source link

- Advertisement -