राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा
- Advertisement -


मुंबई, दि. ३० : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक १,१५३.६० कोटी रुपये खर्चास मान्यता देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला.

२५ जून २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार, तांत्रिक खंड वगळून सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना एकवेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य व ग्रामविकास विभागातील नियमित पदांशी समकक्षता निश्चित करून आवश्यकतेनुसार इतर विभागांतील पदांचाही विचार केला जाईल.

पदांची समकक्षता निश्चित करताना कामाचे स्वरूप, जबाबदाऱ्या, शैक्षणिक पात्रता, सेवा नियम, विद्यमान मानधन आणि सातव्या वेतन आयोगानुसार लागू वेतनश्रेणीचा आधार घेतला जाणार आहे. नियुक्त कर्मचाऱ्यांना समकक्ष पदाचे किमान मूलभूत वेतन, महागाई भत्ता व प्रवास भत्ता मिळेल. सध्या मिळणारे वेतनही संरक्षित राहील. मात्र, पदोन्नती, निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन किंवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार नाही.

अधिसंख्य पदे व्यक्तीसापेक्ष असतील. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर, राजीनामा दिल्यानंतर किंवा सेवा संपुष्टात आल्यानंतर संबंधित पद आपोआप रद्द होईल. भविष्यात अशा प्रकारची नियमितीकरणाची प्रकरणे टाळण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील मनुष्यबळ प्रामुख्याने बाह्यस्त्रोत किंवा सेवा करार पद्धतीने घेण्याचा निर्णयही शासनाने स्पष्ट केला आहे.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

यासंदर्भातील शासन निर्णयाची लिंक – https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202606301330189317.pdf



Source link

- Advertisement -