रायगड-अलिबाग,दि.६(जिमाका):रजि

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू असून, दि.६ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी २३६.६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. खालापूर तालुक्यात सर्वाधिक ३२३.३ मि.मी., महाडमध्ये २७२.२ मि.मी. तर सुधागडमध्ये २६८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतही १५० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. लोणावळा येथे ६२५ मि.मी. तर महाबळेश्वर येथे ४६३ मि.मी. पावसाची नोंद झाल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
सकाळी ११ वाजता च्या अहवालानुसार सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून, पाताळगंगा नदी धोका पातळीवरून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे सातत्याने सतर्कतेच्या सूचना देण्यात येत आहेत. संभाव्य धोक्याच्या ठिकाणी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरावर भर देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यावरही प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. हेटवणे मध्यम प्रकल्प ५३.२३ टक्के भरला असून, जिल्ह्यातील २८ लघुप्रकल्पांपैकी १७ लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. नदीपातळी, धरणांतील पाणीसाठा आणि पावसाच्या स्थितीचा संबंधित यंत्रणांकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही सखल भागांत पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा ठिकाणी प्रशासनाने तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले. विशेषतः आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वयंसेवक, ट्रेकर्स, पोलीस आणि महसूल विभागाने समन्वयाने काम करत अडकलेल्या नागरिक व पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यास प्रशासनाला यश मिळाले आहे. प्रतिकूल हवामानातही बचाव पथके कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
जिल्ह्यात २५ ठिकाणी दगड-माती खाली येण्याच्या तर ७३ घरांच्या परिसरात दरड कोसळल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. या घटनांमध्ये तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. रस्त्यांवर आलेल्या दरडी आणि दगड-माती तातडीने हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी तत्परतेने कार्यवाही केली आहे. दरडप्रवण भागातील कुटुंबांना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. तसेच सखल भागातील काही राज्य, जिल्हा आणि गाव रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे. अशा ठिकाणी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली आहे. जिल्ह्यातील रेल्वे वाहतूकही सुरळीत सुरू आहे. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी जीवितहानीच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. उपलब्ध अहवालानुसार तीन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, पाच व्यक्ती बेपत्ता आहेत. पनवेल, कर्जत आणि महाड तालुक्यांतील धबधबे, तलाव, नदीकाठ तसेच अन्य ठिकाणी घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांकडून शोधकार्य सुरू आहे. नागरिकांनी अतिवृष्टीच्या काळात धबधबे, नदीपात्र, तलाव आणि इतर धोकादायक पर्यटनस्थळी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अतिवृष्टीमुळे पशुधनाचेही नुकसान झाले असून तीन मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील एक बैल, माणगाव तालुक्यातील एक गाय आणि पेण तालुक्यातील एका गायीचा समावेश आहे. तसेच ८६ कोंबड्यांची हानी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार ८४ घरांची पडझड झाली असून, २४२ घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सात गोठ्यांचेही नुकसान झाले आहे.
रोहा तालुक्यातील बाळसई येथील एका मंदिराचे, महाड तालुक्यातील विन्हेरे सुतारकोंड येथील एका शाळेचे तसेच १२ खासगी दुकानांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.
नुकसानग्रस्तांना नियमानुसार मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणा सतर्क असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश शिर्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी,तहसिलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, महावितरण यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ व क्षेत्रीय अधिकारी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. नियंत्रण कक्ष आणि क्षेत्रीय यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यात आला असून, नागरिकांकडून मिळणाऱ्या माहितीवर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे आणि नदी, नाले, धबधबे, पूल व पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करण्याचे टाळावे, झाडाखाली उभे राहणे, खरोखरच गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून प्रसारमाध्यमे, सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार करण्यात येत आहे.
000000





















WhatsApp