अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर-आंबेगावमधील पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर-आंबेगावमधील पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी
- Advertisement -


पुणे, दि. ८ :  जुन्नर व आंबेगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी नियमानुसार प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे धबधबे, घाटमाथा, गडकिल्ले आणि अन्य पर्यटनस्थळांवर दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार जुन्नर तालुक्यातील आंबोली धबधबा (दऱ्याघाट), माळशेज घाट, कांचन धबधबा (हातवीज), रिव्हर्स वॉटरफॉल (नाणेघाट), किल्ले शिवनेरी, चावंड, जिवधन, हडसर, निमगिरी, आहुपे, डिंभे धरण, पोखरी घाट तसेच आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर आणि कोंढवळ धबधबा या पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

या आदेशानुसार वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे किंवा पोहणे, धबधब्याखाली जाणे किंवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा चित्रीकरण करणे, मद्यपान करून अथवा मद्य बाळगून पर्यटनस्थळी प्रवेश करणे, धोकादायक ठिकाणी वाहने उभी करणे, बेदरकार वाहनचालक करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, महिलांची छेडछाड करणे, मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक, डीजे किंवा वाहनांवरील स्पीकर वाजविणे तसेच ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण होईल अशा कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.

याशिवाय धबधबे, धरणे व नदी परिसरात सर्व प्रकारच्या दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांच्या प्रवेशावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना अधिसूचनेतील आदेशांचे काटेकोर पालन करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपण्याचे आवाहन केले आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

०००



Source link

- Advertisement -