Home क्रीडा या १९ वर्षीय गोलंदाजासमोर रोहित, शिखरलाही करावा लागला संघर्ष!

या १९ वर्षीय गोलंदाजासमोर रोहित, शिखरलाही करावा लागला संघर्ष!

0

भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्याची टी20 मालिका रविवार(3 नोंव्हेबर) पासून सुरू होणार आहे. मालिकेचा पहिला सामना दिल्लीमधील अरूण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने सरावादरम्यान चांगलीच मेहनत घेतली.

भारतीय संघाची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी सरावादरम्यान घाम गाळला. पण भारताच्या सरावादरम्यान चर्चा होती ती दिल्लीचा 19 वर्षाचा क्रिकेटपटू केशव डबासची. नेटमध्ये त्याच्या गोलंदाजीचा सामना करताना रोहित आणि शिखर संघर्ष करताना दिसून येत होते.

उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज केशव नेटमध्ये सरावा दरम्यान भारतीय किक्रेटपटूंना गाेलंदाजी करत होता. त्यावेळी त्याने रोहितला एकदा बादही केले आणि शिखरला खूप थकविले.

त्याचा एक चेंडू रोहितच्या बॅटवर लागून आणि तिथेच खाली पडला. त्यावेळी रोहितनेही चेंडू उचलून केशवकडे फेकला.

हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार केशव त्याच्या गोलंदाजीबद्दल म्हणाला, ‘मला खूप छान वाटत आहे. आता काय बोलू हे समजत नाही.’

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रीही केशवची गोलंदाजी बघून खूप प्रभावित झाले. तसेच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरने केशवला कोणत्या क्लबसाठी खेऴतो, असे विचारले.

केशवला भारतीय क्रिकेटपटूंना नेटमध्ये गोलंदाजी करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली होती. याआधी त्याने यावर्षाच्या सुरुवातीला जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ भारतात वनडे मालिका खेळण्यासाठी आला होता तेव्हा ऑस्ट्रेलियासाठी त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी केली होती.

केशव सुरिंदर खन्ना किक्रेट अकादमीकडून किक्रेट खेळतो. तसेच गेल्या वर्षी तो दिल्लीच्या 19 वर्षांखालील संघाकडून एका सामना खेळला होता.

यावर्षी जूनमध्ये केशवच्या वडिलांचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यृ झाला. यामुऴे त्यांच्या कुटुबांत काही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. पण मोठी बहीण आणि भावाला नोकरी असल्यामुऴे त्यांना फारसा त्रास सहन करावा लागला नाही.

पण याबद्दल केशवचे म्हणणे होते की माझ्या गोलंदाजीच्या जोरावर माझ्या कुटुबांसाठी काही करू शकतो. केशव म्हणाला ‘म्हणूनच मी किक्रेट खेळत आहे अजून खूप काही बाकी आहे. पण आशा आहे मी माझे स्वप्न पूर्ण करेल.’