मुंबई, दि. १५ : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेते, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत उद्योजक तसेच प्रशिक्षक यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश भगत, शिक्षण निरीक्षक संजीव जवीर, विविध उद्योजक, श्री रामकृष्ण शिक्षण मंडळ व एकवेष्ट अकॅडेमीचे पदाधिकारी, शिक्षक, दिव्यांग विद्यार्थी, प्रशिक्षक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कौशल्य विकासाद्वारे युवकांना रोजगारक्षम बनविणे, स्वयंरोजगाराला चालना देणे आणि समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देणे हा या कौशल्य सप्ताहाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी कटियार यांनी सांगितले. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ७ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत ‘कौशल्य सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता.
या कौशल्य सप्ताहांतर्गत युवक-युवती, महिला, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एआय अपस्किलिंग, करिअर समुपदेशन, इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, तृतीयपंथीयांसाठी रोजगार मेळावा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट ड्राइव्ह, महिला उद्योजक मेळावा तसेच बौद्धिक दिव्यांग, श्रवणबाधित व इतर दिव्यांग उमेदवारांसाठी कौशल्य स्पर्धा यांचा समावेश होता.
0000
संध्या गरवारे/विसंअ






















WhatsApp