जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादकता वाढ प्रकल्प राबवा – पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादकता वाढ प्रकल्प राबवा – पालकमंत्री शंभूराज देसाई
- Advertisement -


सातारा, दि. २०: जिल्ह्यातील अत्यंत कमी ऊस उत्पादकता असलेल्या क्षेत्रांमध्ये कृषी विभाग आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प राबवला जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादकता वाढ या नावीन्यपूर्ण प्रकल्पास मान्यता देण्यात आली असून, हा प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवावा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे तसेच कृषी विज्ञान केंद्र बारामती, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पांडेगाव व कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषयतज्ज्ञ उपस्थित होते.
ऊस उत्पादन वाढीसाठी व खर्च कमी करण्यासाठी ‘एआय’ हा नवीन पर्याय आला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शेतकऱ्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, वातावरणातील तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान शक्यता यासह वातावरणातील पुढच्या १४ दिवसांत होणारे बदल याबाबतची माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार आहे. यातून ऊस उत्पादन खर्चात ४० टक्क्यांची बचत होऊन, ऊस उत्पादनात ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होऊन एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट सहज शक्य होणार आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार आहे. तरी कृषि विभाग, कृषि विज्ञान केंद्र बारामती, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पांडेगाव,व कृषि विज्ञान केंद्र बोरगाव यांच्यामार्फत शेतक-यांना या प्रकल्पाबाबत लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय संकुल काळोली ता. पाटण येथे सविस्तर प्रशिक्षणही द्यावे, अशाही सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या

उत्पादन वाढवून आणि खर्चात कपात करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा निव्वळ नफा वाढवणे. मातीच्या गरजेनुसार एआय  प्रणाली खतांची मात्रा ठरवते, ज्यामुळे खतांचा अतिरिक्त खर्च कमी होतो. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मशागत आणि देखरेखीचा मजुरी खर्च सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी कमी करणे. हवामान आणि मातीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन गरजेइतकेच पाणी देण्याची सूचना एआय देते. यामुळे पाण्याची ४0 टक्के पर्यंत बचत  करणे. संपूर्ण शेतावर फवारणी न करता, केवळ बाधित क्षेत्रावरच अचूक फवारणी सुचवून खर्च आणि प्रदूषण दोन्ही रोखणे.अंदाजावर शेती करण्याऐवजी अचूक विज्ञानाचा वापर करून निर्णय घेण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये निर्माण करणे. हे या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादकता वाढ प्रकल्पाचा उद्देश असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती फरांदे यांनी बैठकीत सांगितले.

0000



Source link

- Advertisement -