विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांचे निर्देश

विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांचे निर्देश
- Advertisement -


मुंबई, दि. २२ : विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे सुरक्षित, सुलभ आणि देशभरात सहज उपलब्ध व्हावीत, तसेच त्यांना उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर श्रेयांक, पदवी प्रमाणपत्रे आणि पदविका प्रमाणपत्रे तातडीने अपार आयडी आणि डिजी लॉकर पोर्टलवर अपलोड करावीत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ‘एक देश, एक विद्यार्थी ओळखपत्र’ या धोरणांतर्गत अपार आयडी आणि डिजी लॉकर उपक्रमाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्राने या उपक्रमात उल्लेखनीय प्रगती केल्याची माहिती देण्यात आली. राज्यात आतापर्यंत २ कोटी ६७ लाख विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यात आले असून, या कामगिरीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, ३९.६७ लाख श्रेयांक यशस्वीरित्या हस्तांतरित करण्यात आले आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी जून २०२६ पर्यंत झालेल्या सर्व परीक्षांचे निकाल आणि संबंधित विद्यार्थ्यांचे श्रेयांक ३१ जुलै २०२६ पर्यंत अपार आयडीशी संलग्न करून पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश दिले. तसेच, विद्यापीठांनी पदवीदान समारंभाची प्रतीक्षा न करता परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून पदवी व पदविका प्रमाणपत्रांच्या सॉफ्ट कॉपी तातडीने डिजी लॉकरवर उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि श्रेयांक डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहावेत, तसेच देशात कुठेही त्यांची सहज पडताळणी करता यावी, या उद्देशाने सर्व विद्यापीठांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही मंत्री पाटील यांनी दिले. यासंदर्भात उच्च शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांना आवश्यक कार्यवाही करण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ



Source link

- Advertisement -