मुंबई, दि. २३ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘अभंग ते आधुनिक’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, 28 जुलै 2026 रोजी रात्री 8.30 वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर लघु नाट्यगृह, प्रभादेवी, मुंबई येथे हा कार्यक्रम सादर होणार आहे.
‘अभंग ते आधुनिक’ हा संतवाणीपासून आधुनिक मराठी गीतांपर्यंतच्या मराठी संगीताचा सुरेल प्रवास उलगडणारा विशेष सांगीतिक कार्यक्रम आहे. अभंग, संतवाणी आणि मराठी संगीतपरंपरेतील विविध प्रवाहांचा आधुनिक मराठी गीतांशी सुरेल संवाद या कार्यक्रमातून साधला जाणार आहे. परंपरा आणि आधुनिकता यांचा कलात्मक संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी एक वेगळा आणि संस्मरणीय सांगीतिक अनुभव ठरणार आहे.
या कार्यक्रमात गायक नचिकेत देसाई, केतकी भावे-जोशी आणि धनश्री देशपांडे यांच्या सुमधुर आवाजातून संतवाणीपासून आधुनिक मराठी गीतांपर्यंतच्या विविध रचनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. डॉ. समीरा गुजर-जोशी या कार्यक्रमात सुसंवाद साधणार आहेत. विनय चेऊलकर, अक्षय कावळे, विजय तांबे, प्रभाकर मोसमकर, मयुरेश शर्लेकर आणि जयंता बगाडे हे वादक कलाकार साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन ‘स्वरवंती क्रिएशन्स’ यांचे असून, ध्वनी संयोजन प्रतीक पराडकर यांचे आहे.
मराठी संगीतपरंपरेला संतवाणी, अभंग आणि भक्तिसंगीताचा समृद्ध वारसा लाभला आहे. या परंपरेतून विकसित झालेल्या मराठी संगीताने काळानुरूप विविध रूपे धारण केली असून, आधुनिक मराठी गीतांनी या सांगीतिक प्रवाहाला अधिक व्यापक आणि समृद्ध केले आहे. संतपरंपरेतील अभंगवाणीपासून आधुनिक मराठी गीतांपर्यंतचा हा समृद्ध सांगीतिक प्रवास रसिकांसमोर सादर करण्याच्या उद्देशाने ‘ते अभंग आधुनिक’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याबरोबरच संतपरंपरा, मराठी संगीत आणि आधुनिक सांगीतिक अभिव्यक्ती यांचा परिचय अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, मुंबई व परिसरातील संगीतप्रेमी, कला रसिक, मराठी संगीताचे अभ्यासक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
0000
संजय ओरके/विसंअ






















WhatsApp