नाशिक जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- Advertisement -


नाशिक, दि. १ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समन्वयातून जुलै महिन्यात राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात ६८० जनआरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमधून ५० हजार ३२२ लाभार्थ्यांनी विविध आरोग्य सेवा व मोफत तपासण्यांचा लाभ घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या अभियानात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा परिषद, नाशिक महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आरोग्य संस्था, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, एचपीसीएल, रोटरी क्लब, आयएमए तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

एजन्सीनिहाय राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या समन्वयातून ३१ शिबिरे आयोजित करून ५ हजार ७२८ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा परिषदेमार्फत ५०१ शिबिरे घेण्यात आली असून ३४ हजार ८७० लाभार्थ्यांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून १०८ शिबिरे आयोजित करण्यात येऊन ९ हजार ८७३ लाभार्थ्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यात आल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयातून ४४ विशेष उपक्रम राबविण्यात आले असून ३ हजार ४७४ लाभार्थ्यांना त्याचा लाभ झाला. तसेच, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून २० विशेष रक्तदान शिबिरांचे आयोजन

करण्यात आले. या शिबिरांतून ३४९ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले असून हा उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरला.

शिबिरांमध्ये हृदयरोग, कर्करोग, नेत्र, कान-नाक-घसा, त्वचारोग, दंतरोग, मधुमेह, रक्तदाब, माता-बाल आरोग्य आदी विविध आजारांची तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार ईसीजी, रक्त तपासणी, मॅमोग्राफी, पॅप स्मिअर आदी तपासण्या करून गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. याशिवाय आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या अभियानात जिल्ह्यातील सुमारे २४० आरोग्य संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार, सुलभ व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश या अभियानातून प्रभावीपणे साध्य झाल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा विशेष कार्यकारी अधिकारी (मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष) रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000



Source link

- Advertisement -