महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याचे अण्णासाहेब डांगे यांना श्रेय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याचे अण्णासाहेब डांगे यांना श्रेय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Advertisement -


  • डॉ. अण्णासाहेब डांगे यांचा नागरी सत्कार
  • शिक्षण, समाजसेवेच्या प्रदीर्घ वाटचालीला मानाचा मुजरा
  • ‘आम्रवृक्ष’ आत्मचरित्राचे प्रकाशन

सांगली, दि. ९ : ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे हे महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भीष्म पितामह असून, धडधाकट शरीरयष्टी, कणखर आवाज, शिस्त आणि दरारा हे त्यांचे गुण वाखाणण्यासारखे आहेत. तळागाळातील जनतेचे प्रश्न प्रशासकीय पकड व सखोल अभ्यास याद्वारे त्यांनी सोडवले असून, महाराष्ट्राला टँकरच्या जाळ्यातून मुक्त करण्याचे श्रेय अण्णासाहेब डांगे यांना जाते, असे कौतुकोद्‌गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

वाळवा तालुक्यातील आष्टा येथे माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांचे अभिष्टचिंतन, ‘आम्रवृक्ष’ आत्मचरित्राचे प्रकाशन आणि आष्टा शैक्षणिक संकुलातील शैक्षणिक इमारतींचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल, आष्टा येथे आयोजित या कार्यक्रमास सत्कारमूर्ती डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्यासह विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, लोकसभा सदस्य धैर्यशील माने, आमदार सर्वश्री अरुण लाड, सदाभाऊ खोत आणि धैर्यशील कदम तसेच डॉ. सुरेश खाडे, विनय कोरे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, अशोक माने आणि सुहास बाबर, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. राजेंद्र डांगे, सहसचिव विश्वनाथ डांगे यांच्यासह डांगे कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात प्रदीर्घ काळ योगदान देणारे संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या वयाच्या ९१व्या वर्षात पदार्पणानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच, यावेळी त्यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेणाऱ्या ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अण्णासाहेब डांगे हे आपल्यासाठी पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्यांना आपण वैयक्तिकरीत्या काही देऊ शकत नसलो तरी त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उपहार दिला असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘८०च्या दशकाच्या शेवटी’ कर्जमाफीच्या लढ्यात सक्रिय सहभाग अण्णासाहेबांनी घेतला. या लढ्याला राजकीय स्वरूप देऊन शेतकऱ्यांच्या हक्काचा हा लढा व्यापक केला. तळागाळात जायचे असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे आज कर्जमाफी करूनच त्यांच्या वाढदिनी आपण इथे आल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून, त्यापैकी ६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात ५ हजार कोटी रुपये जमा केले असल्याचे सांगून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन महिन्यांत पैसे जमा होतील, असे ते म्हणाले. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्याही खात्यात ५० हजार रुपये भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अण्णासाहेब डांगे पाणीपुरवठा मंत्री असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याचा धाडसी निर्धार केला. प्रत्येक गावात पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी नियोजन करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची स्थापना केली. प्रत्येक गावात पाणीपुरवठ्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. मोगलांच्या काळात देशभरातील हिंदू देवतांच्या मूर्ती आणि मंदिरांची विटंबणा केली गेली होती. त्या सर्व देवालयांचे व घाटांचे पुनरुज्जीवन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. पण, त्यांच्या चौंडी या जन्मस्थानाचा शोध अण्णासाहेब डांगे यांनी घेतला आणि त्याचे पुनरुज्जीवन केले. तसेच, वाटेगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे कामही त्यांनी सुरू केले. त्यांचे कार्य राज्य शासन पुढे नेत असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील जन्मस्थान विकासासाठी राज्य शासनाने ७०० कोटी रुपयांचा विकास आराखडा केला आहे. तसेच, अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी वाढीव भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून, त्यांच्या भव्य स्मारकाचेही काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

सामाजिक क्षेत्राबरोबर शैक्षणिक कार्य करताना अण्णासाहेब डांगे यांनी महाराष्ट्रातील सर्वोत्तम आश्रमशाळा उभी केली आहे. अनेक आव्हानांच्या काळातही दीनदयाळ सूतगिरणी चांगल्या पद्धतीने सुरू आहे, असे ते म्हणाले. अण्णांना जडीबुटींचे उत्तम ज्ञान असून, ते त्यांचा वापर करून शंभरी पार करतील, असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या शतकीय वाढदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करू, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अण्णासाहेब डांगे यांनी अनेक शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्था उभारल्या. या संस्थांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील विविध घटकांना त्यांनी घडविले. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी समाजकारणाला प्राधान्य दिले. अण्णासाहेब डांगे यांचे कार्य आणि योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना निरोगी, दीर्घ आणि आनंदी आयुष्य लाभावे, अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांच्या जीवनाला दिशा मिळाली आहे. त्यांच्या शिस्तीचा, नियमांचा आणि स्वभावाचा आपल्या जीवनात परिपूर्ण उपयोग करून घेतला आहे. आप्पांचे मार्गदर्शन हे आपल्या जीवनाला परिवर्तनाकडे घेऊन जाणारे आहे, असे सांगून त्यांनी अण्णासाहेब डांगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, अण्णासाहेब डांगे यांनी कॅबिनेट मंत्री, ग्रामविकास मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री म्हणून काम करताना सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवले. राजकारणासोबतच शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोठे कार्य त्यांनी केले असल्याचे सांगून त्यांनी आजचा सोहळा हा केवळ सत्कार नसून माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या ९० वर्षांच्या प्रदीर्घ, तत्त्वनिष्ठ आणि समाजोपयोगी सार्वजनिक जीवनाचा गौरव आहे, असे सांगितले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना अण्णासाहेब डांगे यांनी त्यांच्या जीवनातील विविध टप्प्यांतील आठवणींना उजाळा दिला.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. राजेंद्र उर्फ चिमण डांगे यांनी केले. सूत्रसंचालन विजय कडणे व राणी यादव यांनी केले. आभार विश्वनाथ डांगे यांनी मानले. यावेळी संस्थेचे संचालक, पदाधिकारी, मान्यवर, नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शैक्षणिक संकुलात नव्या वास्तूंची भर

या सोहळ्यात शैक्षणिक संकुलातील विविध नूतन वास्तूंचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीला अधिक बळ देणाऱ्या या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते सुभद्रा इंटरनॅशनल स्कूल व अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

०००



Source link

- Advertisement -