महा वॉकेथॉनमधून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचविणार — मंत्री संजय राठोड

- Advertisement -


मुंबई, दि. १८ : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्याला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये  या दिवशी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

मृद व जलसंधारण विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची संकल्पना ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टूमॉरो’ अशी असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देण्यात येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात तीन किलोमीटर अंतराची वॉकेथॉन आयोजित केली जाणार असून सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात येणार आहे.

लोकप्रतिनिधी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग

राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथील बिंदु महादेव चौक प्रवेशद्वार, प्रोमोनेड वरळी समुद्र किनारा येथे होणार असून जिल्हास्तरावरील कार्यक्रम सर्व जिल्ह्यांचे मुख्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, युवक, खेळाडू, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक व क्रीडा संघटना, महिला, उद्योग-व्यापारी संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

महा वॉकेथॉनसाठी क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा सहभागींना सन्मानचिन्ह देण्यात येणार असून, प्रायोजकांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकासाठी २५ हजार, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व गौरवचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष सहभागींपैकी ईश्वरी चिठ्ठीद्वारे सात जणांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचे विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत.

युवकांसाठी रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन

जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींसाठी ‘रील फॉर ़़़सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ ही राज्यव्यापी रील स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक जनतेपर्यंत पोहोचविणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. स्पर्धकांनी ३० ते ६० सेकंदांची रील तयार करून स्वतःच्या सार्वजनिक इन्स्टाग्राम खात्यावर प्रसिद्ध करावी. रीलमध्ये स्वतःचे नाव, जिल्ह्याचे नाव आणि रीलचा उद्देश नमूद करणे तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्याला टॅग करणे आवश्यक आहे.

माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, पारंपरिक जलसंधारण पद्धती आणि नाविन्यपूर्ण संवर्धनाच्या कल्पना या विषयांवर रील तयार करता येणार आहे. रील स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १९ ऑगस्ट २०२६ आहे.

प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० आणि राज्यभरातून १० हजार रील्स तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपये आणि गौरवचिन्ह देण्यात येणार आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल, तर विजेत्यांचा ‘युवा-जलदूत’ म्हणून गौरव करण्यात येणार आहे.

मृद व जलसंधारण सप्ताह, जलसंधारण अभियान आणि महा वॉकेथॉनच्या माध्यमातून माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून जलसंधारणाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या उपक्रमाच्या प्रचारासाठी #MahaWalkathon, #WalkForWater आणि #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

०००

गजानन पाटील/विसंअ



Source link

- Advertisement -