पूरपरिस्थितीमुळे नेपाळ येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती संकलनासाठी ऑनलाइन फॉर्म  

- Advertisement -


मुंबई, दि. २७ : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील व शहरी भागातील पर्यटक आणि नागरिक नेपाळमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अडकलेल्या नागरिकांचा अचूक तपशील तात्काळ ऑनलाइन फॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध करून घेण्याच्या सूचना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत (एसडीएमए) अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी एक https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf विशेष ऑनलाइन फॉर्म तयार करण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यातील तसेच त्या जिल्ह्यात अंतर्गत येणाऱ्या सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (महानगरपालिका/नगरपालिका) अडकलेल्या नागरिकांची माहिती संबंधित लिंकवरून तात्काळ भरून डेटाबेसमध्ये अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ऑनलाइन फॉर्ममधील सर्व अनिवार्य रकाने भरून माहिती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नेपाळमधील परिस्थिती अत्यंत संवेदनशील असल्याने माहिती तातडीने आणि तत्काळ प्रभावाने संकलित करण्यात येत आहे. नेपाळ येथील आपत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रातील कोणते नागरिक किंवा पर्यटक अडकले आहेत, त्यांची माहिती उपलब्ध झाल्यास मदत व बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यास प्रशासनाला मदत होणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळविले आहे.

००००



Source link

- Advertisement -