सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

- Advertisement -


पुणे, दि. २८ : तळेगाव-चाकण-शिक्रापूर (रा.म.-५५) राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-डी या महत्त्वाच्या औद्योगिक व वाहतूक मार्गावरील रस्त्याची पावसाळ्यात झालेली दुरवस्था लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. नागरिक व वाहनचालकांना होणारा त्रास कमी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाची एकूण लांबी ५४ किलोमीटर आहे. त्यापैकी तुलनेने कमी खराब झालेल्या सुमारे ४० किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच MIDC पट्ट्यातील सुमारे १४ किलोमीटर रस्त्याची अधिक दुरवस्था झाल्याने या भागातील खड्डे बुजविणे, साईड शोल्डरची दुरुस्ती तसेच आवश्यक भरावाची कामे पुढील चार दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेऊन या मार्गावरील सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन तसेच रस्त्याची तातडीची दुरुस्ती आवश्यक असल्याने या मार्गावरील दुरुस्तीचे काम एका वर्षासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाऐवजी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री कै. अजितदादा पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विशेष लक्ष देऊन ५४ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती तसेच काही भागातील रुंदीकरणासाठी ५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने जानेवारी २०२६ मध्ये कार्यारंभ आदेश देऊन काही भागात काम सुरू केले होते. मात्र, रस्त्यालगतच्या विविध सेवा वाहिन्यांमुळे निर्माण झालेले अडथळे तसेच युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबर उपलब्ध होण्यात आलेल्या अडचणींमुळे कामाला अपेक्षित गती देता आली नाही. पावसाळ्यात रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन आता दुरुस्तीच्या कामाला गती देण्यात आली आहे.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून रस्त्याच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून, रस्त्याची परिस्थिती तातडीने सुधारण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दुरुस्तीची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.

दरम्यान, तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या कायमस्वरूपी दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (MSIDC) काम हाती घेण्यात येणार असून, पुढील तीन महिन्यांत या कामाला सुरुवात होण्याचे नियोजन आहे. या दर्जोन्नतीमुळे मार्गाची वाहतूक क्षमता वाढण्यास तसेच भविष्यातील वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यास मदत होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली तातडीची दुरुस्ती आणि MSIDC मार्फत प्रस्तावित दर्जोन्नतीची कामे पूर्ण झाल्यानंतर तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.



Source link

- Advertisement -